पुणे – पुण्यात “रोबोट’ करणार वाहतूक नियमन

पुणे – शहरात पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा तसेच सुरळीत वाहतुकीसाठी भविष्यात वाहतूक पोलिसांना रोबोट मदत करू शकतो. पुण्यातील “एसपी रोबोटीक्‍स मेकर लॅब’ च्या विद्यार्थ्यांनी “रस्ता सुरक्षा रोबो’ तयार केला असून मंगळवारी (दि.15) याची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास भविष्यामध्ये शहरात रोबोटच्या माध्यमातून वाहतूक नियमन शक्‍य असल्याचा विश्‍वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध प्रयोग करण्यात येत आहेत. यातच आता वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून एक नाविण्यपूर्ण प्रयोग राबविण्यात येणार असून पुणे वाहतूक पोलिसांकडून या रोबोटची चाचणी घेण्यात येणार आहे. सुरक्षित वाहतूक नियमन याच उद्देशातून या रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. रिमोटच्या माध्यमातून रोबोट नियंत्रीत करणे शक्‍य आहे. विद्यार्थ्यांकडून आजवर हैद्राबाद, ठाणे पोलिसांपुढेही ही संकल्पना मांडण्यात आली. चाचणीदरम्यान रोबोट कशाप्रकारे काम करू शकतो, त्याचा कसा वापर करणे शक्‍य आहे या बाबींचा अभ्यास केला जाणार आहे. अभ्यासांती रोबोटच्या माध्यमातून वाहतूक नियमन शक्‍य असल्यास भविष्यात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
——————-
विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण प्रयत्न करून “रस्ता सुरक्षा रोबो’ तयार केला आहे. एकूणच स्तुत्य उपक्रम असून त्यांची संकल्पना समजून घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष चाचणीनंतर शहरात अशाप्रकारे रोबोटच्या माध्यमातून नियमन शक्‍य आहे का? हे तपासले जाईल.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)