पुणे: ‘पीएमआरडीए’च्या डीपीसाठी सिंगापूरचे सहकार्य

पीएमआरडीएच्या डीपी संदर्भात महाराष्ट्र व सिंगापूर सरकारच्यामध्ये करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंगापूरचे उद्योगमंत्री एस ईश्‍वरन, पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते आदी उपस्थित होते.

पुढील 50 वर्षांचे करणार नियोजन : मुंबईत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) 7 हजार 357 चौ.कि.मी. क्षेत्रासाठी पुढील पन्नास वर्षांसाठीचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याची जबाबदारी सिंगापूर शासन व राज्य शासनाने घेतली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र व सिंगापूर सरकारमध्ये झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी या करारावर देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योगमंत्री एस. ईश्वरन यांनी संयुक्त करारनाम्यावर स्वाक्षरी केली.

यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते, सिंगापूरचे भारतातील उच्च आयुक्त लिम थ्वॉन क्वॉन, सिंगापूर सरकारचे प्रतिनिधी डॉ. फ्रान्सीस च्वॉन उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र आणि सिंगापूरमधील करार हा ऐतिहासिक क्षण आहे. मी व्यक्तीशा सिंगापूर सरकारच्या कार्यपद्धतीने प्रभावीत झालो आहे. महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचा महत्त्वाचा वाटा होता. पुढील तीस ते चाळीस वर्षे ही भूमिका पुणे शहर निभावणार आहे. या करिता पुणे महानगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी सरबाणा जुरॉग कंपनीस देण्यात आली आहे. ही केवळ सुरुवात आहे. प्रत्यक्ष कामाला ताबडतोब सुरुवात झाली पाहिजे.

सिंगापूरचे मंत्री ईश्वरन म्हणाले, सिंगापूर छोटा देश आहे. आम्ही फार कमी देशांबरोबर काम करतो. महाराष्ट्र व सिंगापूर शासनामध्ये पारदर्शकतेचे सामर्थ्य आहे. मोठ्या शहरांचा विकास करण्याचा अनुभव दोन्ही शासनाला आहे. पुणे महानगर विकास आराखड्याबरोबरच पुढील काळात विमानतळासह परवडणाऱ्या घरांसाठी देखील एकत्र काम करू.

पीएमआरडीएचे आयुक्त गित्ते म्हणाले, पुणे महानगर प्राधिकरणाची स्थापना 2015 ला झाली. शहराच्या परिसरातील वाढती लोकसंख्या उद्योग आणि यामुळे वाढणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे होते. पारंपरिक पध्दतीने करण्यात येणाऱ्या विकास आराखड्यामध्ये अनेक प्रकारच्या उणिवा जाणवतात. यावर तोडगा काढण्यासाठी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या महानगरांच्या विकास आराखड्यांचा अभ्यास करण्याचे सुतोवाच केले होते. आंध्रप्रदेशची राजधानी अमरावतीचा विकास आराखडा सिंगापूरकडून करण्यात आला आहे.

पुढील पन्नास वर्षांचा विचार करत हा विकास आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये पुणे महानगरची वाढती लोकसंख्या आणि शहराचा चौह बाजूने होणारा विस्तार नवीन औद्योगिक क्षेत्र, आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाहतुकीचे प्रश्‍न आदीबाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या विकास आराखड्यात रिंगरोड, मेट्रोचे जाळे, पुणे शहर ते पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रस्त्याचे नियोजन, कचरा प्रश्‍न, समान पाणी वाटप, टाऊनशिपच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती, पर्यटन विकास, रोजगार निर्मितीसाठी नवीन औद्योगिक केंद्रांची निर्मितीचा समावेश केला जाणार आहे. या आराखड्याचा मसुदा दहा महिन्यांत करण्यात येणार आहे; तर पूर्ण आराखडा दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल. हा आराखडा राज्यातील एक उत्कृष्ट मॉडेल ठरेल असे प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)