मागील वर्षी पावणेसहा लाख वृक्षांची लागवड
पुणे – राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषदेला यंदाच्या वर्षी (2018-19) पावणेसात लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक 78 हजार 877 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट भोर तालुक्याला देण्यात आले असून, मागील वर्षी 5 लाख 83 हजार 744 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात वृक्षलागवड करण्यात आली. त्यांपैकी 73.84 टक्के म्हणजेच 4 लाख 31 हजार 58 रोपे जीवंत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भोर तालुक्याला सर्वाधिक 63 हजार 786 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 87.97 टक्के म्हणजेच 56 हजार 115 रोपे जीवंत आहेत. वृक्षलागवडीचे तसेच रोपे जीवंत राहण्याचे सर्वाधिक प्रमाण भोर तालुक्यात आहे. वृक्षलागवडीचे सर्वांत कमी म्हणजेच 46.07 टक्के रोपे जीवंत राहण्याचे प्रमाण दौंड तालुक्यात आहे.
दरम्यान, पावसाळ्याअगोदर वृक्षलागवडीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेतली आहे. वृक्ष लागवडीसाठी रोपांची व्यवस्था वनखाते करणार आहे. वनखाते ग्रामपंचायतींना मोफत रोपे देणार आहे. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना वनखात्याशी संपर्क साधून रोपांची मागणी करावी लागणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाबाबत जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना सूचना दिल्या असून, लवकर या कामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात खड्डे खोदण्यात येणार असून, त्याबाबतच्या सूचना सर्व स्तरावर देण्यात आल्या आहेत.
वृक्ष लागवडीचे तालुकानिहाय उद्दिष्ट
आंबेगाव 49 हजार 453, बारामती 56 हजार 240, दौंड 56 हजार 120, हवेली 48 हजार 100, इंदापूर 57 हजार 890, जुन्नर 58 हजार 130, खेड 58 हजार 670, मावळ 38 हजार 844, मुळशी 36 हजार 740, पुरंदर 53 हजार 410, शिरूर 56 हजार 439, वेल्हा 33 हजार 670
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा