पुणे पालिकेकडेच सर्वाधिक थकबाकी

तोडग्यासाठी लवकरच बैठक
पालकमंत्री बापट यांनी सांगितले, पुणे महानगरपालिकेने पाणीपट्टीचे थकीत रकमेपैकी 40 कोटी रुपये द्यायचे मान्य केले आहे. 20 कोटी रुपये भरले आहेत. या थकीत रकमेसंदर्भात तोडगा काढण्यासाठी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, गटनेते आदींची बैठक लवकरच घेण्यात येईल.

पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांचे कालवा समिती बैठकीत गाऱ्हाणे  

पुणे – पुणे महानगरपालिका, एमआयडीसी, सिंचन संस्था आणि साखर कारखाने यांच्याकडे पाणीपट्टीची एकूण 392 कोटींची थकबाकी आहे. यातील सर्वाधिक थकबाकी ही पुणे महानगरपालिकेकडे आहे. ही रक्कम 384 कोटी रुपये इतकी आहे. या निधीतून पगार, धरण सुरक्षा कामे, कालवा स्वच्छता आदीं कामे करणे अपेक्षित आहे. मात्र ही वसुली होत नसल्याने पाटबंधारे विभागाला विविध कामे करण्यात अडचणी येत आहेत. ही थकबाकीची रक्कम लवकर वसूल करावी, यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालवा समितीसमोर गाऱ्हाणे मांडले.

शासकीय विश्रामगृह येथे कालवा समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत शहराला पिण्यासाठी तर ग्रामीण भागातील शेतीसाठी पाण्याच्या नियोजनाबरोबरच पाणीपट्टी थकबाकीचा विषय चर्चेला आला. या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदाराज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पुणे महापालिकेकडे 384 कोटी, कुरंकुंभ एमआयडीसीकडे 7.52 कोटी आणि नगरपालिकांकडे 46 लाख रुपयांची पाणीपट्टी थकबाकीची आकडेवारी समितीसमोर मांडण्यात आली.

शासनाने 2016 पासून सिंचन व्यवस्थापनाचे काम पाटबंधारे मंडळाकडे वर्ग केले आहे. त्यामुळे पाणीपट्टीच्या रकमेतून आस्थापना, वेतन व भत्ते, धरणांची दुरुस्ती, कालवे वितरण प्रणालीचे परिक्षण व दुरुस्तीची कामे, कालवा स्वच्छता कामांची यांत्रिकी विभागाची देयके आदींचा खर्च करावा लागत आहे. लाभधारकांकडून थकीत पाणीपट्टीचा भरणा होत नसल्याने सिंचन व्यवस्थापन करण्यात अडचणी येत निर्माण होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. थकीत पाणीपट्टी भरून पाणी अर्ज प्राप्त झाल्याशिवाय उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी देण्यात येणार नाही. तसेच लाभक्षेत्रातील साखर कारखान्यांनी बिगर सिंचनाची व सिंचनाची पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहनही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले.

…थेट पाणी कनेक्‍शन कापू नका
एमआयडीसी, नगरपालिका आणि साखर कारखाने यांच्याकडे पाणीपट्टीच्या थकीत रकमेसाठी थेट पाणी कनेक्‍शन तोडू नका, पहिल्यांदा नोटीस द्या, समज द्या त्यानंतर कारवाई करा, अशी मागणी कालवा समितीच्या सदस्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)