पुणे पालिका सुरू करणार साथरोग नियंत्रण कक्ष

पावसाळ्यासाठी आरोग्य विभागाचा विशेष कृती आराखडा

पुणे – पावसाळ्यात उद्‌भवणाऱ्या साथीच्या रोगांना वेळीच अटकाव घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यासाठी स्वतंत्रपणे साथरोग नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार आहे. नायडू सांसर्गिक रुग्णालयात हा कक्ष असणार असून त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक महापालिका उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. या पूर्वी महापालिकेने 2008 मध्ये स्वाईन फ्लूचा शहरात मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला असताना असा कक्ष स्थापन केला होता.

पावसाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांचा प्रदूर्भाव वाढतो. त्यामुळे आरोग्य विभागाकडून गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता, यावर्षी साथ रोगाला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना मदत दिली जाणार असून हा कक्ष 24 तास सुरू असणार आहे. तसेच हा कक्ष पालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांशी संलग्न केला जाणार असून नागरिकांना वेळीच मदत मिळावी यासाठी सर्व यंत्रणा जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी सज्ज ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर हा कक्ष असणार असून या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी काही पथकेही कार्यरत असणार असल्याचे डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले. या नियंत्रण कक्षांचा संपर्क क्रमांक अद्याप निश्‍चित करण्यात आलेला नसला तरी, पुढील तीन ते चार दिवसांत तो निश्‍चित करून मे महिन्याच्या अखेरीस हा कक्ष कार्यान्वीत करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाचाही कृती आराखडा
शहराच्या आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याप्रमाणेच आरोग्य विभागाकडूनही यंदा पहिल्यांदाच आरोग्य व्यस्थापन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आरखडा विशेषत: पावसाळ्यासाठी असणार आहे. त्यात, शहरातील खासगी तसेच महापालिकेच्या हॉस्पीटलची माहिती, शहरातील सर्व ऍम्ब्युलन्सची माहिती, पावसाळ्यात पसरू शकणाऱ्या साथीच्या आजारांवरील प्रतिबंधात्मक उपचारासाठीची औषधे पालिकेच्या सर्व रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिवाय, प्रामुख्याने सर्पदंश तसेच श्‍वानदंशाच्या लसी उपलब्ध करून देण्यात येणार असून उंदीर आणि घुशींमुळे पसरू शकणाऱ्या जिवघेण्या लेप्टोस्पायरेसीस या साथीच्या आजारावरील औषधे तसेच उपचाराची सुविधेची माहिती या आराखड्यात असणार असल्याचे डॉ. हंकारे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)