पुणे: पालिका मुख्यसभेत वर्गीकरणांचा पाऊस

71 प्रस्तावांच्या 19 कोटींना मान्यता

पुणे – महापालिकेच्या अंदाजपत्रकातील कामे “डीएसआर’ अर्थात विभागनिहाय दरपत्रक अंतिम झाल्याने ती नुकतीच निविदा प्रक्रियेत आहेत. त्यात आता नगरसेवकांच्या “स’ यादीतील तब्बल 19 कोटी रुपये अंदाजपत्रकातील प्रस्तावित कामे वगळून इतर कामांसाठी वळविण्यास महापालिकेच्या मुख्यसभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे यंदाही महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या मोडतोडीची परंपरा कायम असल्याचे समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे सुमारे 71 प्रस्ताव असून त्यात रस्ते, पाणी पुरवठा, पदपथ तसेच पथदिव्यांचा खर्च सिमेंट रस्ते आणि भवन विभागाच्या सुरू असलेल्या कामांसाठी वळविण्यात आला. महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांसाठी त्यांना स्वतंत्र तरतूद उपलब्ध करून दिली जाते. ती ‘स’ यादी म्हणून ओळखली जाते. नगरसेवकांकडून अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी स्थायी समिती अध्यक्षांना या कामांसाठी पत्र देऊन तरतूद मागितली जाते. त्यानुसार, समिती अध्यक्षांकडून आवश्‍यकतेनुसार तरतूद दिली जाते. मात्र, अंदाजपत्रक सुरू होताच नगरसेवकांकडून आपलीच प्रस्तावित कामे रद्द करून त्याचे वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दिले जातात. असे स्थायी समितीने मान्यता दिलेले सुमारे 20 कोटींचे 75 प्रस्ताव स्थायी समितीने मान्य करून ते मुख्यसभेच्या मान्यतेसाठी ठेवले होते. त्यातील 19 कोटींच्या 71 प्रस्तावांना मुख्यसभेने अवघ्या 15 मिनिटांत मान्यता दिली आहे. त्यात 2 लाख रुपयांपासून दीड कोटींच्या वर्गीकरणांचे प्रस्ताव होते.

“कॉमन’ निधीही वळविला
गेल्या काही वर्षांत वर्गीकरणावरून सत्ताधाऱ्यांना टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे नगरसेवकांच्या “स’ यादी मधील निधीच वर्गीकरणाद्वारे दिला जातो. मात्र, गुरूवारी चक्क औंध येथील नाट्यगृहाच्या दुरूस्तीचा खर्च भाजपच्या नगरसेविकेच्या प्रभागात वळविण्यात आला. त्यास विरोधीपक्षांनीही विरोध केला. तसेच अशा प्रकारे दुसरा निधी एका नगरसेविकेला दिला, तर आमच्याही प्रस्तावांना मान्यता द्यावी, अशी मागणी केली. मात्र, सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव मान्य करत वर्गीकरणाचा नवा पायंडा सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासनाने प्रस्तावित केलेला निधीही नगरसेवकांच्या प्रभागात वळविण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)