महापौर टिळक यांची माहिती
पुणे – 300 वर्षांहून अधिक काळापासून निघणारा पालखी सोहळा हा कोणत्याही विशिष्ट जाती धर्माचा सोहळा नाही. या सोहळयानिमित्ताने लाखो वारकरी पुणे शहरात दोन दिवसांच्या मुक्कामी येतात. त्यामुळे त्यांना आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या मूलभूत सेवा सुविधा महापालिकेकडून दिल्या जाणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी दिली.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक सण-उत्सव, तसेच पुरस्कारांवर खर्च करण्यास महापालिकेच्या मुख्यसभेत बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे “पालखी सोहळ्याला हा नियम लावू नये,’ अशी मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी मुख्यसभेत केली. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने पक्षनेत्यांची बैठक घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना, निवास, स्वच्छतागृहे तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
दरम्यान, मुख्यसभा सुरू होताच; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव आणि योगेश ससाणे यांनी सभागृहात टाळ आणि मृदुंग वाजवित प्रवेश केला. मात्र, पहिल्या मुख्यसभेत प्रथा डावलून अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आल्याने महापौर मुक्ता टिळक यांनी या दोन्ही नगरसेवकांना समज देत या प्रकाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच या सभेत श्रध्दांजली वाहिली जाते. त्यामुळे यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही या सदस्यांना दिल्या.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा