पुणे – पारंपरिकपेक्षा “1121′ बासमतीचा सुवास

close up of basmati rice

देश, परदेशांतून मागणी : पारंपरिकची केवळ 10 टक्के विक्री


कमी कालावधी लागत असल्याने लागवडीस प्राधान्य


हॉटेल व्यावसायिक, केटरर्स, चायनीज रेस्टॉरंटकडून मागणी

– विजयकुमार कुलकर्णी

पुणे – पारंपरिकपेक्षा “1121′ प्रजातीच्या बासमती तांदळाची सध्या बाजारात चलती आहे. आकाराने लांब आणि शिजल्यानंतर सुटसुटीत तसेच फुलणाऱ्या या तांदळाला देश, परदेशांतून जास्त मागणी आहे. पीक लवकर येत असल्याने शेतकरीही त्याची लागवड करण्यास पसंती देत आहेत. परिणामी, पारंपरिक तांदळाची लागवड घटली आहे.

सध्या बाजारात 90 टक्के “1121′ तांदूळ विकला जात आहे. पारंपरिक तांदूळ एक किलो शिजविल्यानंतर अडीच किलो भात होतो. तोच अधिक फुगत असल्याने “1121′ शिजवल्यानंतर साडेतीन किलो भात होतो. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, केटरर्स, पुरवठादार आणि चायनीज रेस्टॉरंटकडून “1121’ला मोठी मागणी असल्याचे सांगून तांदळाचे व्यापारी राजेश शहा म्हणाले, केवळ घरगुती तसेच चवीला प्राधान्य देणाऱ्यांकडून अद्यापही पारंपरिक बासमतीची खरेदी करण्यात येत आहे. साधारणत: पाच वर्षांपूर्वी शहरासह देशातील बाजारपेठांमध्ये अखंड पारंपरिक बासमतीसह तुकड्यालाही मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र, ती आता लक्षणीय घटली आहे. पारंपारिकचे पीक आल्यानंतर ते चार-सहा महिने जुने झाल्यानंतर वापरावे लागते. तर, “1121′ लगेच वापरता येतो. दोन्हींनाही बाजारात सारखाच भाव मिळतो. “1121’चे पीक हाती येण्यास पारंपरिकपेक्षा महिनाभर कमी कालावधी लागतो. त्यामुळे शेतकरी “1121′ लावत आहेत. मागील दोन महिन्यांत इराणमध्ये मोठ्या प्रमाणात या तांदळाची निर्यात झाली आहे. त्यामुळे महिनाभरात क्विंटलच्या भावात हजार ते पंधराशे रुपयांनी वाढ झाली आहे.

पारंपरिक बासमती – 1121 बासमती
उत्पादित राज्ये पंजाब, हरियाणा – पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड,
पिकाचा कालावधी साडेतीन महिने – अडीच महिने
भाताची लांबी 7.5 एमएम – 8.5 एमएम
सध्याचा बाजारभाव 10,000 ते 10,500 रु. क्विंटल – 10000 रु. क्विंटल

भारतातून वार्षिक 40 लाख टन तांदळाची निर्यात होते. त्यापैकी 34 लाख टन “1121′ बासमती आहे. 34 लाख टनमधील 24 लाख टन शेला बासमती असून, 10 लाख टन स्टीम बासमती आहे. उर्वरित सहा लाख टनांमध्ये 4 लाख टन ब्राऊन, तर, 2 लाख टन पारंपारिक बासमती तांदळाचा समावेश आहे. निर्यातीपैकी 24 लाख टन तांदूळ सौदी अरेबियात, 4 लाख टन इराणमध्ये, तर, उर्वरित 12 लाख टन युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जगातील इतर देशांत निर्यात होते.
– राजेश शहा, तांदळाचे व्यापारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)