पुणे – पाण्याची नासाडी भोवणार!

बेशिस्तांवर आजपासून कारवाईचा बडगा


पाणीपुरवठा, मालमत्ता व्यवस्थापन विभाग सज्ज


औंध आणि बाणेरसह परिसरात कारवाईचा दणका

पुणे – महापालिकेने बंदी घातली असतानाही पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव तसेच मोटारी लावून पाणी खेचणाऱ्यांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. त्यासाठी पाणी पुरवठा विभाग आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र पथके नेमली असून त्यांच्या माध्यमातून ही कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, औंध आणि बाणेरसह परिसरातील काही सोसायट्यांनी पाणी वाया घालवले म्हणून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यातच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्के कमी पाणीसाठा असल्याने पाणीकपात वाढविण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडून केली जात आहे. मात्र, महापालिकेने त्यास नकार दिला आहे. मात्र, त्याचबरोबर शहरातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्यात आदेश काढून शहरातील सर्व वॉशिंग सेंटर, खासगी तसेच शासकीय जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश दिले असून ज्या ठिकाणी पाणी खेचण्यच्या मोटार लावण्यात आल्या आहेत. त्यांच्या मोटारी जप्त करून त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इमारत देखभाल करणारा ठेकेदारही दोषी
पाणी पुरवठा विभागाकडून या तपासणी मोहीमेसाठी पथके नेमून कारवाईचे आदेश दिलेले असले तरी, एसएनडीटी आणि चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता साहेबराव दांडगे यांच्या सूचनेनुसार, औंध, बाणेर तसेच बोपोडी भागात काही सोसायट्यांची तपासणी केली असता, टाक्‍या भरून पाणी वाया जात असल्याचे समोर आले. या सोसायट्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तर महापालिकेच्या वारजे येथील बीएसयूपी इमारतीच्या टाकीमधूनही पाणी वाया जात असल्याचे या इमारतीच्या देखभाल दुरूस्तीचे काम असलेल्या ठेकेदाराकडून त्यासाठी 1,500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे दांडगे यांनी “प्रभात’ला सांगितले.

जलतरण तलावांचीही तपासणी
पाणीपुरवठा आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडूनही शहरातील पालिकेच्या जलतरण तलावांची सोमवारपासून तपासणी सुरू केली जाणार आहे. शहरात पालिकेचे 31 तलाव असून त्यातील 27 तलाव सुरू आहेत. हे तलाव चालविण्यास देण्यात आलेल्या ठेकेदारांना महापालिकेकडून मागील आठवड्यातच नोटीस बजावून शनिवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे तलाव बंद केले आहेत, की नाही? याची तपासणी केली जाणार आहे. तसेच ज्या ठेकेदरांकडून बंद केलेले नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यानंतरही सुरू केल्याचे आढळल्यास त्यांचे काम काढून घेतले जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)