पुणे – पाण्याची चिंता करू नका

मुख्यमंत्र्यांचे महापौरांना आश्‍वासन


तुर्तास कपातीतून पुणेकरांना दिलासा

पुणे – जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या पाण्याच्या निकलानंतर महापालिकेने पाणी कपात करावी यासाठी मागील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाने महापालिकेचे पाणी तोडले होते. हा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असला तरी, पाणी कपात होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे जालना येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीसाठी गेलेल्या महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून पाण्यासाठी कोणतीही चिंता करू नका, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापौरांना दिले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते.

कालवा समिती बैठकीत शहराला 1,350 ऐवजी 1,150 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणावर जात पाणीपुरवठ्याचे पंप पोलीस बंदोबस्तात बंद केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतरही जादा पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिल्याने महापालिकेने अखेर पाणीकपातीचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने महापालिकेस वर्षाला 8.19 टीएमसी पाणी द्यावे, असा निर्णय दिला; तर शासनाने महापालिकेस वर्षाला 11.50 टीएमसी पाणी द्यावे असा करार असल्याने त्या करारानुसारच पाणी वापरावे असे पत्र पाठविले. त्यामुळे पुन्हा एकदा पाणी कपात वाढण्याची शक्‍यता होती. मागील आठवड्यात पुन्हा एकदा पाटबंधारे विभागाने महापालिकेचे पाणी तोडले होते. यावेळी पालिकेकडून जलसंपदा विभागास लेखी पत्र देत शहराच्या पाण्याबाबत उच्चस्तरीय बैठक होईपर्यंत शहराला 1,350 एमएलडी पाणी कमी करू नये, अशी मागणी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर, जालना येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी गेलेल्या महापौरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पाण्याबाबत विनंती केली. त्यावेळी जलसंपदामंत्री महाजन सुद्धा उपस्थित होते. यावेळी उपलब्ध पाणी ग्रामीण आणि शहरी भागास देण्याबाबत नियोजन सुरू असून कोणत्याही स्थितीत पाणी कमी पडून दिले जाणार नसल्याचे या दोन्ही नेत्यांनी महापौरांना आश्‍वस्त केले आहे. त्यामुळे तुर्तास कपातीतून पुणेकरांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)