पुणे – पवित्र पोर्टलच्या मदत केंद्रांवर उमेदवारांची गर्दी

मुदत संपणार असल्याची अफवा पसरवल्याने केंद्रांवर गोंधळ

पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलच्या मदत केंद्रावर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी शुक्रवारी (दि.25) मुदत संपणार असल्याची अफवा उमेदवारांनी व्हॉट्‌सअॅपद्वारे पसरवली. यामुळे केंद्रांवर सुमारे 300 उमेदवारांनी गर्दी केली. या गर्दीमुळे केंद्रावर गोंधळ झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी शिक्षण विभागाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. बहुसंख्य उमेदवारांनी अनकेदा संधी देऊनही अद्याप प्रोफाईल अपडेट केलेले नाहीत. उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रोफाईल अपडेट करण्यासाठी उमेदवारांना संधी मिळावी याकरिता राज्यात विभागनिहाय मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

पुण्यात कॅम्प येथील आझम कॅम्पसमधील अँग्लो उर्दु मुलांची शाळा या ठिकाणी मंगळवार (दि.22) पासून मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या संगणक कक्षात उमेदवारांचे प्रोफाईल अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी उमेदवारांची गर्दी होऊ लागलेली आहे. काही उमेदवारांनी व्हॉट्‌सअॅपद्वारे प्रोफाईल अपडेट करण्याची मुदत संपणार असल्याचा मेसेज फिरविला. यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी शुक्रवारी मदत केंद्राकडे सकाळपासून धाव घेत मोठ्या संख्येने गर्दी केली. आम्ही लांबच्या गावाहून आलो आहे, आधी आमचे प्रोफाईल अपडेट करा, असा आग्रह काही उमेदवारांनी कर्मचाऱ्यांकडे धरला. मात्र, कर्मचाऱ्यांनी रजिस्टरमध्ये नोंदणी केल्याप्रमाणेच उमेदवारांचे काम मार्गी लावण्याला प्राधान्य दिले.

अचानक उमेदवारांची गर्दी वाढल्याने केंद्रांवर उमेदवारांना बसण्यासाठी वर्ग खोल्यांची संख्या अपुरी पडू लागली. त्यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्‍त करण्यात आला. त्यातच केंद्रावर लवकर कामे होत नसल्याने उमेदवारांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. उमेदवारांनी गोंधळ केल्यामुळे काही वेळ कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवण्यालाच प्राधान्य दिले. अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी मदत केंद्रावर धाव घेत उमेदवारांची समजूत काढून त्यांना शांत केले.

अर्ज दाखल करणाऱ्या सर्वांचे प्रोफाईल अपडेट करणार
पवित्र पोर्टलच्या मदत केंद्रावर संगणक कक्षात सहा कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक उमेदवारांनी प्रोफाईल अपडेट करण्यासाठी अर्ज केले आहेत. शिक्षण विभागाकडून प्रोफाईल अपडेट करण्यासाठी कोणतीही शेवटची मुदत अद्याप जाहीर केलेली नाही. सर्व उमेदवारांचे प्रोफाईल अपडेट करण्यात येणार आहे. प्रोफाईल अपडेट करण्याचे काम सुरूच राहणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवा पसरवून मदत केंद्रावर गर्दी करू नये, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे प्रोफाईल अपडेट करून त्यांना ई-मेलवर त्याची प्रत पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)