पुणे – परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय

विद्यार्थ्यांना 300 रुपये परत करण्याचे निर्देश

पुणे – कौशल्य विकास व उद्योजक विभागामार्फत मान्यता दिलेल्या इयत्ता दहावीच्या व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी वाढवण्यात आलेल्या शुल्कात घट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आता 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, 400 रुपये शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना 300 रुपये परत करण्याचे निर्देश राज्य मंडळाकडून विभागीय मंडळाना देण्यात आले आहेत. वाढीव शुल्क कमी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्व व्यावसायिक विषयांऐवजी मल्टी स्कील फाउंडेशन आणि इंट्रोडक्‍शन टू बेसिक टेक्‍नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्‍नॉलॉजी, इलेक्‍ट्रिकल टेक्‍नॉलॉजी आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स टेक्‍नॉलॉजी या विषयांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीच्या शुल्कात वाढ करून 400 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. एकीकडे राज्य सरकार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी देत असताना दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी मात्र, शुल्कवाढ करण्यात आल्याचा विरोधाभास निर्माण झाल्याने हे शुल्क कमी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी राज्य मंडळाकडे केली होती. राज्यमंडळाने शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला वाढीव शुल्काबाबत फेरविचार करण्यासाठी निवेदन सादर केले होते. त्यानंतर राज्य मंडळाने त्या बाबतचा प्रस्ताव सरकारला पाठवला.

सरकारने हा प्रस्ताव मान्य करत शुल्क कमी करून 100 रुपये शुल्क स्वीकारण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्य मंडळाने विभागीय मंडळांना परिपत्रक पाठवून 100 रुपये शुल्क म्हणून घ्यावे आणि 400 रुपये शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित 300 रुपये परत करण्याबाबत स्पष्ट निर्देश केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)