पुणे – परीक्षार्थींचे हाल; परिषद होणार मालामाल

विविध परीक्षांचे शुल्क वाढविण्याचा राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या परीक्षांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय परिषदेच्या सभेत घेण्यात आला. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यातून परीक्षा परिषद मालामाल होणार असून परीक्षार्थींना मात्र आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

परीक्षा शुल्क, गुणपत्रकांचे शुल्क यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न परिषदेकडे जमा होत असते. गेल्या पाच वर्षांपूर्वी ठरविण्यात आलेले परीक्षा शुल्क सध्या लागू आहे. आता यात वाढ करण्याचे परिषदेने सुचविले आहे. हा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला. यावेळी परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण मंडळ अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर, लेखाधिकारी वसुधा भागवत यांच्यासह इतर अधिकारी, अशासकीय सदस्य उपस्थित होते. या सभेत सर्वानुमते परीक्षा शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क 200 रुपये
इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दरवर्षी सुमारे 9 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणत खर्च करण्यात येतो. यामुळे या परीक्षेच्या शुल्कात 80 रुपयांवरुन 200 रुपयांपर्यंत वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

टीईटीसाठी 700 रुपये
टीईटी परीक्षेचे शुल्क आधीच जास्त असताना आता त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. पेपर-1 अथवा पेपर-2 साठी खुल्या व इतर मार्गावर्गींयासाठी 500 रुपयांवरुन 700 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपयांवरुन 350 रुपये वाढ होणार आहे. दोन्ही पेपर साठी अनुक्रमे 800 रुपयांऐवजी 1 हजार 200 रुपये व 400 रुपयांवरुन 600 रुपये वाढ करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी नव्याने 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

विविध शुल्कांत दुप्पट वाढ
डी.टी.एड. परीक्षांच्या विविध प्रकारचे शुल्क वाढणार आहे. यात नवीन अध्यापक विद्यालयाला संलग्नता क्रमांक प्राप्त करण्यासाठी नव्याने 1,500 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. विद्यालयाच्या नूतीकरणासाठी 2 हजार रुपयांऐवजी 3 हजार रुपये, प्रति विषय परीक्षेसाठी 75 रुपयांऐवजी 100 रुपये, दुबार गुणपत्रक व प्रमाणपत्रकासाठी 500 रुपयांऐवजी 1 हजार रुपये, गुणपत्रक व प्रमाणपत्रक पडताळणीसाठी 100 रुपयांवरुन 500 रुपये, तीन वर्षांनंतर नावात दुरुस्तीसाठी 500 रुपयांवरुन 1 हजार रुपये शुल्क घेण्यात येणार आहे.

विभागीय परीक्षांचे शुल्क 10 पट वाढणार
टीटीसी परीक्षेसाठी 1 हजार 500 रुपयांऐवजी 1 हजार 600 रुपये एवढे शुल्क घेण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या विभागीय परीक्षांच्या शुल्कात सर्वात जास्त 200 रुपयांवरुन 2 हजार रुपये वाढ होणार आहे. या परीक्षेच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी 500 रुपये, गुणपडताळणीसाठी प्रति पेपरला 50 ऐवजी 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. शासकीय वाणिज्य टंकलेखन व संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षांमध्येही दुप्पटीने शुल्क वाढ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)