पुणे – पतीचा घटस्फोट अर्ज मान्य केल्यानंतरही पत्नीला दिलासा

पोटगीसह घरात राहू देण्याचे आदेश

पुणे – घटस्फोटाच्या दाव्यात अपील करेपर्यंत त्याने दुसरा विवाह केला. मात्र, तो पतीच्या अंगलट आल्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या निकालावरून दिसून येत आहे. कौटुंबीक न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मान्य केल्यानंतर पत्नीने केलेल्या अपिलाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली खरी, परंतु प्रथमवर्ग न्यायालयात धाव घेतलेल्या पत्नीला कौटुंबीक हिंसाचाराच्या दाव्यात न्यायालयाने दिलासा दिला आहे. तिला पोटगी, नुकसान भरपाईसह सासरच्या घरी राहण्यास परवानगी न्यायालयाने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. माधवीच्या वतीने अॅड. सतीश कांबळे यांनी काम पाहिले. जून 2010 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. परंतु, लगेचच त्यांच्यात वाद सुरू झाले. पुजेला उशिरा आल्याने पतीने तिचा सर्वांसमोर अपमान केला. तसेच त्याच्या घरच्यांनीही तिला टोमणे माण्याची संधी सोडली नाही. त्यानंतर “माहेरच्यांनी सोने दिले नाही, तुला घरातील कामच जमत नाही’ म्हणून त्रास देणे सुरू केले. पतीच्या कामातील व्यस्ततेमुळे तिला तो वेळच देत नव्हता. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने तिला घरातून हाकलून दिले. दरम्यान, त्याने घटस्फोटाचा दावा दाखल केला. तसेच विवाहितेनीही हुंड्यासाठी छळ होत असल्याबाबत न्यायालयात धाव घेतली. यादरम्यान पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज कौटुंबीक न्यायालयाने मान्य केला.

पतीचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केल्यानंतर पत्नीला उच्च न्यायालयात अपील करण्यास उशीर झाला. या कालावधीत त्याने दुसरा विवाह केला. दरम्यान, पत्नीने घटस्फोटाच्या अर्जावर उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर त्या अर्जाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर नुकताच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जानवी केळकर यांनी विवाहितेला दिलासा देताना तिच्या बाजूने निकाल दिला. त्यामध्ये न्यायालयाने तिला पोटगी स्वरूपात 10 हजार रुपये, 25 हजार रुपये नुकसान भरपाई आणि 20 हजार रुपये तक्रार अर्जाचा खर्च स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पत्नीला सासरच्या घरी राहण्यास परवानगी दिली आहे. त्या शिवाय पतीला तिची राहण्याची योग्य सोय करणे, भाडेतत्त्वावर तिला राहायचे झाल्यास डिपॉझिट आणि भाड्याची व्यवस्था करणे, तसेच पतीला कोणताही हिंसाचार न करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)