पुणे : पगार नाही, तर कामही करणार नाही

रुग्णवाहिका चालकांचे जि.प. समोर आंदोलन


पाच महिन्यांपासून वेतन नसल्याने संताप

पुणे- मागील पाच महिन्यांपासून पगार नाही, पीएफ, ईएसआयदेखील नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील रुग्णवाहिका चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नोव्हेंबर 2017 ते मार्च 2018 पर्यंत पगार न मिळाल्यामुळे या कंत्राटी वाहनचालकांनी शुक्रवारी (दि. 13) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शासनाने कंत्राटी तत्वावर वाहनचालक भरले आहेत. त्यांचे वेतनही राज्य शासनाकडूनच येते. वेतनाची रक्कम शासनाने जिल्हा परिषदेकडे जमा केली तरच जिल्हा परिषद संबधीत ठेकेदाराकडे रक्कम वर्ग करते. मात्र, शासन वेतनाची रक्कम पाठविण्यास दिरंगाई करत असल्याने वाहनचालकांना वेळेत वेतन मिळत नाही. त्यामुळे राज्य शासनाने वेळेवर रक्कम द्यावी.
प्रवीण माने, सभापती, आरोग्य आणि बांधकाम समिती

कंत्राटी वाहचालक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या सर्व मागण्यांबाबत निवेदन दिले आहे. प्रशासनाने 12 एप्रिलपर्यंत थकीत सर्व रक्कम खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू, रक्कम जमा न झाली नाही. त्यामुळे जोपर्यंत पगार जमा होत नाही, तोपर्यंत आरोग्य सेवा थांबवित असल्याचे संघटनेने या निवेदनात म्हटले आहे.

जिल्हा पररिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकांवर 75 कंत्राटी वाहनचालक आहेत. 2017 मध्ये या वाहनचालकांना सहा महिन्यांपासून पगार दिले नव्हते. त्यावेळी बांधकाम वा आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी त्यावर तोडगा काढत दिवाळीपूर्वी या वाहनचालकांचे पगार केले. मात्र, त्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून वाहनचालकांचे पुन्हा पगार रखडले आहेत. एवढच काय तर जवळपास दोन वर्षाचा पीएफ व ईएसआयची रक्कमही संबधीत ठेकेदाराने त्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही.

महालक्ष्मी एंटरप्रायजेस आणि श्री स्वामी समर्थ महिला बचत गट या संस्थांकडे यापूर्वी ठेकेदारी होती. मात्र संबधित ठेकेदारांनी वाहनचालकांना मुळ वेतनापैकी केवळ 6 हजार रूपयेच खात्यावर जमा करत होते. उर्वरीत रक्कम ठेकेदारांच्या खात्यावर जमा होते. मूळ वेतनापेक्षा कमी वेतन वाहनचालकांना दिले जात आहे. तसेच पीएफच्या नावे कापलेली रक्कम वाहनचालकांची पीएफ खातीच न काढल्याने ठेकेदाराच्या खात्यातच जमा होत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)