पुणे – नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे बना

डॉ. मृणालिनी फडणवीस : “एमईएस’ आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा पदवीग्रहण समारंभ उत्साहात

पुणे – संस्कृती, गणित, माहिती तंत्रज्ञान, आयुर्वेद, सनदी लेखापाल आदी क्षेत्रांमधील ज्ञानवंतामुळे भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. आपल्या पदवी शिक्षणामधील कौशल्याचे खऱ्या ज्ञानात रूपांतर करून कोणाकडे नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे बनायला शिका. त्यातून समाजात नवीन आदर्श निर्माण करा, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

“एमईएस’ आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभात फडणवीस बोलत होत्या. यावेळी “एमईएस’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद लेलेसह आदी उपस्थित होते.

कुलगुरू फडणवीस म्हणाल्या, “नोकरी मागणारे होण्यापेक्षा तुम्ही सरकारच्या मुद्रा, स्टार्ट अप या सारख्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा काहीतरी व्यवसाय करावा. शिक्षण हे खर्च नाही, तर ती गुंतवणूक आहे. या गुतंवणुकीवर लगेच परतावा मिळत नाही, पण भविष्यात त्याचे चांगले रिटर्न निश्‍चितच मिळत असतात. शिक्षणातून आपण मानवाचा विकास करत असतो, त्याच्यात मानवी मूल्यांची जोपासना करत असतो.

भारतीय विद्यार्थ्यांचे गणित, भाषा, तार्किक बुद्धी चांगली आहे. त्यामुळे येत्या काळात जगाला अशी कौशल्य असणारे मनुष्यबळ आपण पुरवू. भविष्यातील बदलणाऱ्या तंत्रज्ञानावर आपण बारकाईने लक्ष ठेवून ती आपण आत्मसात केल्यास आपला भविष्यकाळ उज्ज्वल असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन वाढवले पाहिजे. कुठलेही अपयश हे यशाकडे जाणारी एक पायरी असते असा विचार आपण अंगिकारला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी 1 हजार 138 विद्यार्थ्यांनी पदवीग्रहण केली. डॉ. अपर्णा आगाशे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपप्राचार्य डॉ. अंकुर पटवर्धन यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)