पुणे : ‘निवडक अक्षरधन’ साहित्य रसिकांच्या भेटीला

पुणे – शतकोत्तर तपपूर्तीचा टप्पा ओलांडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील विसाव्या शतकातले ‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभागाच्या वतीने डॉ. अरुणा ढेरे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प हाती घेण्यात आला. “अक्षरधन निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका विसावे शतक’ या ग्रंथाचे संपादन साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी यांनी केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

संस्थेची उद्दिष्टे व फलश्रुती, वाङ्‌मयीन व सामाजिक पर्यावरण विषयक लेख, व्यक्‍तिवेध, मराठी भाषाविषयक लेख, पुस्तक परीक्षणे, मराठी साहित्य विश्वाचे कवडसे, व्यापक साहित्य विश्वाचे भान, अशा सात विभागांत मिळून 75 निवडक लेख वाचकांना 700 पृष्ठांच्या या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. रा. भि. जोशी, दत्तो वामन पोतदार, दु. का. संत, पु. य. देशपांडे, ग. त्र्यं. माडखोलकर, श्री. ना. बनहट्टी, श्री. शं. नवरे, म. श्री. दीक्षित, रा. ब. महाजनी, वि. वा. शिरवाडकर, रा. शं. वाळिंबे, प्रतापराव शिंदे, गंगाधर पानतावणे, चंद्रकांत बांदिवडेकर, भालचंद्र नेमाडे, डॉ. गं. ना. जोगळेकर, कमल देसाई, डॉ. म. द. हातकणंगलेकर, डॉ. प्रभाकर पाटील, द. श्री. बापट, अ. ना. देशपांडे या मान्यवर लेखकांसह अनेक लेखकांचे महत्त्वपूर्ण लेख या ग्रंथात असणार आहेत.

1906 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे “मसापत्रिका’ हे मुखपत्र 1993 पासून मासिकरूपात विविध ज्ञानविस्ताराबरोबर प्रकाशित होण्यास प्रारंभ झाला. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या परिषदेने आपल्या मुखपत्राचा उपयोग संस्थेच्या ध्येय उद्दिष्ट यांच्या परिपूर्तीसाठी केलेला आहे. हा ग्रंथ वाचकांसाठी मोलाचा ठेवा ठरेल.
– प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद.

ज्या काळात वाङ्‌मयीन नियतकालिकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. त्या काळात मसाप पत्रिकेने एका विशिष्ट वाङ्‌मयीन भूमिकेतून काम केले. मसापपत्रिकेत समकालीन वाङ्‌मयीन वातावरण व त्याचे प्रवाह यांचे प्रतिबिंब पडले आहे. विसाव्या शतकात मराठी साहित्य विश्वात स्वतःची नाममुद्रा उमटवणाऱ्या सर्व मान्यवर आणि महत्त्वाच्या लेखकांची उपस्थिती हे अंकाचे वैशिष्ट्ये म्हणता येईल. हा ग्रंथ म्हणजे शतकातील साहित्याचा छेद आहे.
– डॉ. अरुणा ढेरे, संशोधन विभाग प्रमुख.

महाराष्ट्र साहित्य पत्रिका काढण्यामागे परिषदेची ध्येयदृष्टी होती. ती म्हणजे साहित्यिक बंधुभाव निर्माण करणे. पत्रिकेने मराठीच्या विकासप्रक्रियेत सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुरुवातीपासून मराठी परिभाषानिर्मिती, समीक्षा – संशोधन यांना चालना तसेच वाङ्‌मय इतिहासलेखनासाठी वार्षिक समालोचनपर अंक काढणे, हे धोरण महत्वाचे आहे. पत्रिकेच्या स्वागतशील धोरणामुळे अनेक नवे- जुने लेखक पत्रिकेकडे वळलेले दिसतात. पत्रिकेतील निवडक लेखसंग्रह म्हणजे “अक्षरधन’च ठरणार आहे. त्यातून मराठी साहित्यपरंपरेचे अर्करूप दर्शनही घडेल.
– नीलिमा गुंडी, ज्येष्ठ अभ्यासक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)