पुणे-नाशिक मार्गावरील दुभाजक तोडले

चाकणमधील स्थिती : उंची कमी असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले

चाकण- पुणे-नाशिक महामार्गावर आधीच कमी उंची असलेले दुभाजक आहेत. त्यातच हे दुभाजक तोडून व्यावसायिक तथा वाहनचालक आपली सोय करीत आहेत. मात्र, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर अनेक दुचाकीचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून जीवाची पर्वा न करता या दुभाजकावरून गाडीविरुद्ध दिशेला दामटत असल्याने एखादा मोठा अपघात होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक व आंबेठाण चौक या वर्दळीच्या ठिकाणी पादचारी धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत असतात. त्यातून आजवर अनेक पादचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. कमी उंचीच्या या दुभाजकाची उंची वाढवून त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे नाशिक महामार्गावर केवळ चाकण हद्दीत मागील काही वर्षात कमी उंचीच्या दुभाजाकांमुळे अनेक निरपराध पादचारी, दुचाकीस्वार मुत्यूमुखी पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी फोडलेले दुभाजकाचे कामदेखील करण्यात आलेले नाही. त्यातच प्रकाशरोधक फलक, पावसाळ्यातील चिखल, वाहनांच्या धुरामुळे व उडणाऱ्या धुळीमुळे काळेकुट्ट झालेले गतिरोधक पांढरे पट्टे न मारल्याने रात्रीच्या अंधारात दिसत नसल्याने वाहनांना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण चिंतेची बाब आहे.
या वर्दळीच्या महामार्गावर अहोरात्र लहान-मोठ्या व अवजड वाहनांची ये जा सुरू असते. चाकण औद्योगिक वसाहतीमुळे चिंबळी फाट्यापासून भाम पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत झालेली असून, हजारोंच्या संख्येने नागरिक राहण्यास आलेले आहेत. त्यामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार यांची मोठ्या प्रमाणात महामार्गावरून येणे-जाणे सुरू असते. अडथळ्याच्या शर्यतीमध्ये अडकलेला नाशिक फाटा ते चांडोली सहापदरीकरणाचे काम दिवसेंदिवस लांबत चालले आहे. अनेक अडचणीमुळे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडत असल्याने सहापदरीकरण केव्हा होईल, अशी विचारणा सर्व स्तरातून होत आहे.

  • वाहन चालकांचे डोळे दिपताहेत
    पुणे-नाशिक या नेहमीच्या वर्दळीच्या महामार्गावर उंच दुभाजकांची गरज आहे. प्रकाश रोधक तुटलेले असल्याने रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे चालकांचे डोळे दिपत आहेत. अनेक बेशिस्त दुचाकी वाहनधारक अचानक दुभाजक ओलांडूनविरुद्ध दिशेच्या रस्त्यावर वाहन नेतात. चिंबळी फाटा, मोई फाटा, आळंदी फाटा, गवतेवस्ती, मेदनकरवाडीकडे जाणारा रस्ता ते चाकण आणि पुढे शिरोलीपर्यंत सर्रासपणे अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)