पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणांवर हातोडा

राजगुरूनगर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर झालेली अतिक्रमणे पुन्हा आज (शनिवारी) पोलीस, महसूल, नगरपरिषद व महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून हटविण्यात आली. तर याठिकाणी पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राजगुरुनगर शहरात वर्षभरात अनेकदा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर झालेले अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. अतिक्रमणे काढल्यानंतर लगेचच या ठिकाणी अतिक्रमणे केली जात होती यात शहरातील बड्या दुकानदारांचा मोठा समावेश आहे. त्यांनी थेट रस्तावर दुकाने थाटली आहेत. प्रशासनाला कोणतीही भिक न घालता सर्रास अतिक्रमणे केली जात आहेत, यामुळे राजगुरुनगर शहरात वाहतूककोंडी होत असते. देशात एकमेव पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग असा आहे की राजगुरुनगर शहरात वाहतूककोंडी होतेच त्यामुळे राज्यापासून केंद्रापर्यंत वाहतूककोंडीचे शहर म्हणून राजगुरुनगर शहराकडे पहिले जात आहे. त्यामुळे प्रशासनावर दबाब येत आहे. मात्र स्थानिक पथारीधारक, मोठे दुकानदार अतिक्रमणे करतच आहेत. त्यावर पर्याय म्हणून शासनाने शहरातील संपूर्ण रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे काम सुरू झाले आहे
चांडोली टोलनाका ते डाकबंगला (शासकीय विश्रामगृह) पर्यंत आज पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी नाना उगले, नगरपरिषदेचे अतिक्रमण प्रमुख गणेश देव्हरकर,महामार्गप्राधिकरण विभागाचे अधिकारी अतिक्रमण कारवाईत सहभागी झाले होते. आज झालेल्या कारवाईत सुमारे 100 पेक्षा जास्त दुकानांच्या पुढे झालेले अतिक्रमणे प्रशासनाने काढून टाकली. आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून अतिक्रमणे काढण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपरिषद, पोलीस प्रशासन व महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग, पोलीस विभाग आणि नगरपरिषद यांच्या संयुक्‍त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. याकरिता सहाय्यक जिल्हाधिकारी प्रसाद यांनी 26 जणांची नेमणूक केली होती. त्यांच्या माध्यमातून शहरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. आमदार सुरेश गोरे म्हणाले की, राजगुरुनगर शहराच्या बाहेरील बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले असल्याने त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून शहरातील महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे त्यासाठी 12 कोटी रुपये निधी आला आहे. तसेच बस स्थानकाजवळील पूल रुंद केला जाणार आहे. महामार्गावर अतिक्रमणे पूर्णता हटविली जाणार आहेत.

  • दुतर्फा तीन मीटरचा रस्ता वाढणार
    राजगुरुनगर शहरातून जाणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग असून त्यावर शहरातील अरुंद पूल यामुळे वाहतूककोंडी होत होती. शहरातीलही कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग मोकळा ठेवणे हा मोठा पर्याय असल्याने प्रशासनाने त्यावर प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. अनेकदा सांगूनही अतिक्रमणे होत असल्याने धडक कारवाई सुरू करून अतिक्रमणे काढलेल्या ठिकाणी रस्ता केला जाणार आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला तीन मीटरचा रस्ता वाढविण्यात येणार असून त्यावर फुटपाथ बांधण्यात येणार आहे. त्याबरोबरच दोन्ही बाजूकडून गटार बांधण्यात येणार आहे.
  • वाहतुकीची कोंडीची समस्या मोठी होती. शहरातील रस्ता दोन पदरी आहे. अतिक्रमणामुळे शहरात वाहतूककोंडी होत होती. यावर उपाय करण्यासाठी प्रांताधिकारी, उपविभागीय अधिकारी, खेड पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी महामार्ग प्राधिकरण यांच्यात बैठक झाली त्यानुसार अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. आठवडाभरापासून रस्त्याच्या रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. राजगुरुनगर शहरातून जाणारी जड वाहनांना सकाळी पाच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहेत.
    – अरविंद चौधरी, पोलीस निरीक्षक, राजगुरूनगर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)