पुणे, नाशिकच्या रेल्वे प्रवासात मिळणार पुस्तके वाचायला 

– डेक्कन क्वीन व पंचवटी एक्‍सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय 
– 15 ऑक्‍टोबर रोजी शुभारंभ 

मुंबई: मुंबईपासून सुरू होणाछया पुणे व नाशिकच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना आता एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन व पंचवटी एक्‍सप्रेस या दोन गाडयांमध्ये प्रवाशांना पुस्तके वाचण्याचा आनंद घेता येणार आहे. या दोन रेल्वेमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सची प्रथमच (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना सुरु करण्यात येत असून, वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने 15 ऑक्‍टोबर रोजी याचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

-Ads-

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, 15 ऑक्‍टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या 3 वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यानिमित्त यंदाच्या वर्षापासून मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई-पुणे) आणि पंचवटी एक्‍स्प्रेस (मनमाड-मुंबई-मनमाड) या दोन गाड्यांमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सचा (फिरते ग्रंथालय) उपक्रम सुरु होत आहे. या दोन्ही रेल्वे गाड्यांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले वाचनदूत प्रवाशांना विनाशुल्क वाचनसेवा देण्यास सुरुवात करणार आहेत, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

पुस्तकांच्या गावी, भिलार येथेही वाचनध्यास या सलग वाचनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या पाश्वभूमीवर शनिवार 13 व रविवार 14 ऑक्‍टोबर या दोन दिवसांत 75 वाचक, आपल्या आवडत्या पुस्तक-घरात एकूण 12 तास पुस्तक-वाचन करणार आहेत. संगणक अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, एस. टी. वाहक अशा विविध प्रकारचे चोखंदळ वाचक सलग वाचनासाठी भिलारला आवर्जून येणार आहेत. भिलार येथेच “पाऊसवेळा’ हा साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमही 14 रोजी सायं. 5.00 वा. योजण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने येत्या 15 ऑक्‍टोबर रोजी सायं. 5.00 वा. “मला उमगलेले राम गणेश गडकरी, गदिमा व पुलं’ हा विशेष कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्व रसिंकांना विनाशुल्क पाहता येणार आहे. मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी “वाचनतास’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 15 ऑक्‍टोबर 2018 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत प्रत्येकाने किमान एक तास त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे जाऊन आवडेल ते पुस्तक घेऊन वाचण्याचे आवाहनही शासनातर्फे करण्यात आले असल्याची माहिती तावडे यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)