पुणे नव्हे अतिक्रमणांचे स्टेशन…

शैलेश शिंदे ,प्रवासी, विश्रांतवाडी
पुणे- रस्त्याच्या कडेला आणि फूटपाथवर पथारी व्यावसायिक, हातगाडी चालकांनी मांडलेला संसार, नो एन्ट्रीमधून कर्णकर्कश हॉर्न वाजवित येणारे दुचाकीस्वार, बेश्‍तिस्तपणे रस्त्यावरच उभ्या पीएमपीएमएलच्या बसेस, रिक्षा आणि त्यातून होणारी रिक्षाचालकांची मुजोरी या प्रकारांमुळे पुणे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, याबाबत माहिती असतानाही महापालिका प्रशासनाचे अतीक्रमण पथक आणि वाहतूक पोलीस याकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष करत आहेत, त्याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

भुयारी मार्ग केला पण…
पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची रेलचेल असते, त्यामुळे येथे वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची गर्दी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ही गर्दी आणि प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने येथील सखल भाग उंच करून त्यावर उड्डाणपूल उभारला आहे. या पुलाच्या खालूनच प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. त्याचा प्रवाशांना फायदा झाला असलातरी बहुतांश जणांकडून वेळ वाचविण्यासाठी आणि शारिरीक त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावरूनच ये-जा करत असल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने नव्हे तर नागरिकांनीच स्वत:ला शिस्त लावून घेण्याची आवश्‍यकता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमपीएमएल बसचालकांना शिस्त लावणार कोण…!
रेल्वे स्थानकाप्रमाणेच स्टेशन परिसरातील पीएमपीएमएलचे बसस्थानकही तेवढेच महत्त्वाचे समजले जाते. या स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. ससून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बसस्थानकावरून बसेस ये- जा करत असतात, वास्तविक प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने त्याठिकाणी बसस्थानक उभारण्याची आवश्‍यकता आहे. मात्र; हे बसस्थानक लहान असल्याने प्रवाशांना रस्त्यावरच बसची वाट पाहात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब आहे.

प्रवेशद्वाराला अतिक्रमणाचा विळखा
रेल्वे एसटी स्थानकावरून मुंबईसह अन्य महत्त्वाच्या शहरांसाठी गाड्या सोडण्यात येतात. त्यामुळे येथे दररोज शेकडो प्रवाशांची रेलचेल असते. मात्र, या स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच पथारी आणि हातगाडी व्यावसायिकांनी प्रवाशांची कोंडी केली आहे. या प्रवेशद्वारावरच या व्यावसायिकांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात जाताना आणि येताना त्रास सहन करावा लागत आहे. या व्यावसायिकांना प्रवासी काही बोलल्यास बहुतांशी वेळा वादाचे प्रकार घडले आहेत.

खासगी गाड्यांच्या चालकांची मुजोरी
रेल्वे स्थानक परिसर हा खासगी गाडी चालकांची आणि त्यांच्या एजटांची जणु जहागीरीच बनली आहे. प्रवाशांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांची चढाओढ सुरू असते. काही एजटांच्या गाड्या बसस्थानकांच्या बाहेर रस्त्यावरच उभ्या असतात. त्याचा त्रास प्रवाशांना होत असतो. याबाबत प्रवाशांनी अनेकवेळा वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडे तक्रारही केली आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने या एजटांचे चांगलेच फावले आहे.

वाहतूक कोंडी नित्याचीच
पुणे स्टेशन परिसरातील बहुतांश रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे ससूनकडून स्टेशनकडे येणारा रस्ता वन वे करण्यात आला. मात्र, वाहन चालकांनी या “वन वे’ संकल्पनेला आणि वाहतूक पोलिसांना आव्हान दिले असून या रस्त्यावरून सर्रास दुहेरी वाहतूक सुरू असते. असे असूनही बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

वाहतळाचा उपयोग तरी काय…
रेल्वे स्थानक परिसरात ससून रुग्णालय देखील आहे. येथे राज्यथरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे येथील गर्दी लक्षात घेऊन पालिकेने लाखो रुपये खर्च करून वाहनतळ उभारले आहे. मात्र, केवळ पावती फाडावी लागते म्हणून बहुतांशी वाहनचालक त्याचा वापर करत नाहीत. हे वाहनचालक रस्त्यावरच त्यांची वाहने पार्किंग करत असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

पुणे स्टेशन परिसरातील रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी केली जात असल्याने तसेच हातगाड्या उभ्या असल्याने पायी जाताना त्रास होत असतो. याबाबत एकदा वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. ही बाब निश्‍चितपणे निषेधार्ह अशीच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)