पुणे : नऱ्हे, धायरीत टॅंकर लॉबी सक्रिय

धायरी- महापालिकेत समावेश झालेल्या उर्वरित धायरी गावात पाणीटंचाईची झळ बसत आहे. या टंचाईचा फायदा उठविण्यासाठी टॅंकर लॉबी उतावीळ झाली असून नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून पिळवणूक करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नऱ्हे, धायरी, खडकवावला पायथ्यावरील वाड्या, वस्त्या, किरकिटवाडी, नांदेड गाव या परिसरात भीषण स्थिती समोर आली आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी सिंहगड रोड परिसरातील धायरी गावाचा उर्वरित भाग महापालिकेत समाविष्ट केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडील हा भाग आता महापालिकेच्या ताब्यात आला आहे. समाविष्ट गावांचा निधी तुटपुंजा ठरत असल्यामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. त्यात उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. मूलभूत सुविधांचा ठणठणाट असल्यामुळे या गावात विकास दृष्टीपथात कधी येणार आहे, असा सवाल नागरिकांतून उमटत आहे. पाणीटंचाईची झळ बसत असताना नागरिक विहिर, बोअरचा वापर करीत आहेत. त्यातून पाणी उपसा करून नागरिकांना पाणी देण्याचे काम टॅंकर लॉबी करीत आहेत. यासाठी 600 ते 1200 रुपये प्रती टॅंकर दर आकरणी सुरू आहे. हा व्यवसाय दोन महिन्यांपासून बाळसे धरत आहे. त्यात अजून दोन ते तीन महिने ही लॉबी नफेखोरीच्या मार्गावर धावणार आहे.

धायरी, नऱ्हे, किरकिटवाडी, नांदेड गाव परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर लॉबी सक्रिय झाली आहे. त्यात पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी आणून या परिसरात दिले जात आहे. धायरी परिसरात अनेक सदनिका उभारल्या आहेत. त्यांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. बेसुमार वाढलेल्या शहराशेजारील नऱ्हे, किरकिटवाडीत भीषण स्थिती असताना नागरिक पाणीटंचाईने व्याकूळ झाले आहेत.

खडकवासल्याच्या पायथ्याच्या वाड्या तहानलेली
खडकवासला धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या, वस्त्यांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. धरण उशाला अन्‌ कोरड घशाला अशी विदारक स्थिती जाणवत असल्याने नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. धरणाच्या पाण्यावर पुणे शहर आणि शहराशेजारील तालुके समृद्ध झालेली असताना या वाड्या, वस्त्या तहानलेल्या आहेत. या भागात पाण्याची सुविधा मिळत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)