पुणे: नगरसेवकांच्या उधळपट्टीला लागणार लगाम

पक्ष बदनामीचा सामना करावा लागल्याने भाजपकडून लवकरच नियमावली
नयमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात

पुणे, नगरसेवकांकडून महापालिकेच्या निधीतून केल्या जाणाऱ्या खर्चाच्या उधळपट्टीमुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सोशल मिडीया तसेच प्रसिध्दी माध्यमामधून मोठ्या प्रमाणात पुणेकरांच्या रोषाचा आणि टिकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निणर्य सत्ताधारी भाजपने घेतलेला आहे. त्यासाठी पक्षाकडून लवकरच नियमावली केली जाणार असून ही नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नगरसेवकांच्या नावाच्या पाट्या, एकच काम दोनवेळा करणे, आवश्‍यकता नसताना प्रभागात कामे करणे, बकेट वाटप, ज्यूट पिशव्या वाटप, बाकडे बसविणे, प्रभागातील भिंती रंगविण्याच्या नावाखाली या भिंतीवर स्वत:ची नावे मोठ्या अक्षरात टाकून घेणे अशा कामांचा यात समावेश असल्याचे या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

महापालिकेत वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपला पुणेकरांनी ऐतिहासीक विजय मिळवून देत महापालिकेचा कारभार हाती दिला आहे. मात्र, अवघ्या वर्षभरातच भाजप नगरसेवकांकडून प्रभागांसाठी चुकीच्या पध्दतीने निधी खर्ची केला जात असल्याचे वारंवार समोर येऊ लागले आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या तुलनेत भाजप नगरसेवकांना अंदाजपत्रकात प्रभागासाठी 6 ते 10 कोटींचा निधी देण्यात आला आहे. मात्र, या निधीतून आवश्‍यक विकासकामे करण्याऐवजी नगरसेवकांकडून सुस्थितीमधील पथदिवे बदलणे, पेव्हींग ब्लॉक बदलणे, जुनी चांगली स्वच्छतागृहे पाडून नवीन उभारणे, रस्ते वारंवार डांबरीकरण करणे, नामफलक बसविणे, जागा मिळेल तिथे भिंती रंगविणे, बाकडे टाकणे अशी कामे केली जात आहेत. विशेष म्हणजे अनेक नगरसेवकांकडून मागील वर्षीही हीच कामे केली असताना या वर्षातही पुन्हा त्याच जागांवर तीच कामे केली जाणार आहेत. त्यामुळे पक्षाला मोठ्या प्रमाणात टिकेचा समाना करावा लागत आहे. ही बाब वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने घेण्यात आली असून पुणेकरांचा विश्‍वास कायम ठेवण्यासाठी नगरसेवकांनी करायच्या कामांना भाजपकडून नियमावली घालून दिली जाणार आहे. ही नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच बैठक घेऊन ती नगरसेवकांना दिली जाणार असल्याचेही या पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)