पुणे: धडक मोहिमेत 59 वाहने आढळली दोषी

आरटीओकडून स्कूलबस फिटनेस तपासणी : 24 वाहने ताब्यात

पुणे – शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना वाहन योग्यता प्रमाणपत्र नसणे, वैध परवाना न बाळगणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, स्कूलबस नियमावलीची पूर्तता न करणाऱ्या स्कुलबसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी धडक मोहिमेत केलेल्या तपासणीत 59 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 24 वाहने ताब्यात घेतली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना स्कूलबसची फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश स्कूलबस चालकांनी वाहनांची फिटनेस तपासणी न करता बेकायदेशीररित्या विद्यार्थ्यांची ने-आण केली जात होती. त्या पार्श्‍वभूमीवर आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध शाळा आणि रस्त्यांवरून धावणाऱ्या स्कूलबसची तपासणी केली. धडक मोहिमेदरम्यान 14 पथकाद्वारे स्कूलबस तपासणीला प्राधान्य देण्यात आले; तर कारवाई दरम्यान 220 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 59 स्कूलबस वाहने दोषी आढळून आली असून, त्यापैकी 24 वाहने आरटीओ कार्यालयात ताब्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये 17 खासगी आणि 7 शालेय वाहनांचा समावेश आहे.

स्कूलबस नियमावलीप्रमाणे वाहनचालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्‍यक आहे. मात्र, आरटीओच्या आवाहनानंतर बसमालकांनी फिटनेस तपासणी करण्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, सर्व परवानाधारक वाहतूकदारांनी स्कूलबस नियमावलीचे पालन करावे. शालेय प्रशासन आणि बस कंत्राटदार यांनी परस्पर सामंजस्य करार करावेत. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही याची दक्षता पालकांसह वाहतूकदारांनी घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. स्कूलबसवर कारवाईमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

शहरातील विविध रस्त्यांवर बेकायदेशीररित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहिमेदरम्यान कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी 14 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्कूलबस नियमावलीप्रमाणे वाहतुकीचे स्वागत तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
– विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)