पुणे: धक्‍कादायक… शहरात अवघी 121 शांतता क्षेत्रे

राज्यशासनाच्या आदेशानंतर नव्याने यादी : महापालिका शासनाला अहवाल पाठवणार


कोणती क्षेत्रे घोषित करायची याचा निर्णय राज्यशासन घेणार


महापालिकेच्या अधिकारात जाहीर झाली होती 2,047 शांतता ठिकाणे

पुणे -राज्यशासनाच्या आदेशानुसार, शहरातील शांतता क्षेत्राची महापालिकेकडून नव्याने यादी तयार करण्यात आली आहे. त्यात शहरात अवघी 121 शांतता क्षेत्रे असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार, शहरातील प्रमुख रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरात ही ठिकाणी निश्‍चित केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा शांतता ठिकाणे जाहीर करण्याचे अधिकार महापालिकेस होते. तेव्हा शहरात 2,047 शांतता ठिकाणे पालिकेने घोषित केलेली होती.

एकही कारवाई नाही…

शांतता क्षेत्रात गोंगाट अथवा कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. त्याचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूदही आहे. मात्र, गेली अनेक दशके महापालिका अथवा वाहतूक पोलिसांकडून अशा क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केले म्हणून अद्याप तरी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. या उलट महापालिकेकडून दरवर्षी नियमितपणे या क्षेत्रांमध्ये न चुकता नवीन सूचना फलक लावले जाण्याचे काम मात्र इमाने इतरबारे सुरू आहे. त्यामुळे केवळ महापालिकेचा निधी उधळण्यासाठी शांतता क्षेत्र आहेत की काय असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

शांतता क्षेत्र निश्‍चित करण्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 10 ऑगस्ट 2017 रोजी सुधारित नियमावली तयार केली आहे. याबाबत राज्य सरकारच्या नगरविकास आणि ग्रामविकास खात्याला सूचना दिल्या आहेत. नवीन नियमावलीनुसार रुग्णालये आणि शिक्षण संस्थांजवळचा 100 मीटरपर्यंतचा परिसर हा शांतता क्षेत्र असेल असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्याचबरोबर अन्य ठिकाणी शांतता क्षेत्र प्रस्थापित करण्याचे राज्य शासनाला अधिकार असणार आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने नोव्हेंबर 2017 मध्ये महापालिकेस पत्र पाठवून नव्याने शांतता क्षेत्र निवडून त्यांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात केवळ शाळा, न्यायालय परिसर आणि रुग्णालयांच्या परिसराबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, पालिकेच्या पर्यावरण विभागाने शासनाच्या निकषांनुसार, ही शांतता क्षेत्राची यादी तयार केली असून ती लवकरच शासनास पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार, राज्यशासन कोणती क्षेत्रे घोषित करायची याचा निर्णय घेणार आहे. दरम्यान, ही पहिल्या टप्प्यातील क्षेत्र असून शासनाकडून नंतर निकषांमध्ये बदल केल्यास या ठिकाणांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून सांगण्यात आले.

शांतता क्षेत्र केवळ फलकावरच…

राज्यशासनाकडून शांतता क्षेत्राबाबत निर्णय घेण्यात येणार असला तरी शहरातील शांतता क्षेत्र केवळ फलकावरच असल्याचे वास्तव आहे. शहरात 37 लाख खासगी वाहने असून अरूंद रस्ते, रस्त्यावरील अतिक्रमणे यामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून ध्वनी प्रदूषण तसेच शांतता क्षेत्रासाठी असलेले निकष पाहता केवळ कात्रज तलाव, पाषाण तलावाच्या परिसरातच शांतता क्षेत्राच्या निकषांच्या आत ध्वनिप्रदूषण आहे. शासनाच्या निकषानुसार, निवासी भागात दिवसा 55 डेसीबल पेक्षा जास्त आवाज नसावा तर व्यावसायिक क्षेत्रात ही मर्यादा 60 डेसीबल आहे. मात्र, शहराच्या सर्व भागात वाहनांच्या आवाजाची मर्यादा ही तब्बल 65 डेसीबलच्या वर आहे. तर उत्सवांच्या कालावधीत ही आवाजाची मर्यादा 75 डेसीबल पेक्षाही जास्त असते. त्यामुळे शहरातील सध्याची ध्वनी प्रदूषणाची आकडेवारी पाहता शांतता क्षेत्र घोषीत केल्यानंतरही केवळ फलकांपुरतीच मर्यादीत असल्याचे वास्तव आहे.

(शासनाच्या निकषानुसार, निवासी भागात दिवसा 55 डेसीबल पेक्षा जास्त आवाज नसावा)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)