पुणे – देवा! स्क्‍वॉर्पियोचालकाला “नो हेल्मेट’चा दंड

– ऑनलाइन चलनात गोलमाल? : अनेक प्रकरणांत फोटोचा पुरावाच नाही
– सीसीटीव्हीच्या 6 लाख 32 हजार केसेस “पेंडिंग’

गणेश राख

पुणे – सीसीटीव्हीद्वारे दंड आकारताना त्याचा पुरावा म्हणून वाहनचालकाला फोटो उपलब्ध करुन देणे वाहतूक पोलिसांना बंधनकारक आहे. तसेच नियम मोडल्याचे ठिकाण, वेळ, गुन्ह्याचा प्रकार आदींची माहिती द्यावी लागते. मात्र, अनेक केसेसमध्ये अशा प्रकारचा पुरावा दिला जात नसल्याचे समोर आले आहे. तर एका केसमध्ये चक्क चारचाकी वाहनाला (स्क्‍वॉर्पियो) “नो हेल्मेट’चा दंड लावल्याचे समोर आले आहे. तर, हा दंड ज्याला लावला गेला आहे, त्याचा फोटो पाहिल्यास दुसऱ्याच वाहनाचा फोटो दिसत आहे. यामुळे अशा प्रकारे हजारो पुणेकरांना नाहक दंड लागल्याची शक्‍यता आहे.

एखाद्या वाहनचालकाला सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन दंड लावताना वाहनचालकांला त्याची चूक कळावी, यासाठी आणि पुरावा म्हणून फोटो उपलब्ध करुन देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच कोणत्या ठिकाणी नियम मोडला याचा पत्ता, तारीख, गुन्ह्याचा प्रकार आणि आकारलेला दंडही द्यावा लागतो. तसेच जर वाहतूक पोलिसांनी एखाद्या वाहनचालकावर ई-मशीनद्वारे मॅन्युअली कारवाई केली. तर वाहनचालकाचा मोबाइल नंबर घेऊन (offender mobile number) त्याची नोंद केली जाते. तसेच नियम मोडल्याचे ठिकाण टाकावे लागते. मात्र, पाहणी केलेल्या अनेक चलनांमध्ये अशी प्रक्रिया झाली नसल्याचे समोर आले आहे. अनेक केसेसमध्ये सीसीटीव्हीद्वारे लावलेल्या दंडांमध्ये वाहनचालकांना फोटो उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. यामुळे वाहनचालकाच्या मनात संभ्रम असून दंड कशाप्रकारे लावला याविषयी शंका उपलब्ध होत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी लावलेला दंड नियमानुसार लावण्यात न आल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.
——————————–
असा आढळून आला प्रकार
प्रकरण 1.
एका दुचाकीस्वाराला सदाशिव पेठेतील शिळमकर रस्ता चौकात सीसीटीव्हीद्वारे झेब्रा क्रॉसिंगचा 200 रुपये दंड लावण्यात आला आहे. मात्र, यासाठी त्याला फोटो उपलब्ध करुन दिलेला नाही. तसेच त्याचा मोबाइल आणि लायसन्स नंबरही उपलब्ध नाही. यामुळे हा दंड कसा लावण्यात आला, अशी शंका त्याला पडली आहे.
——————
प्रकरण 2.
एका वाहनचालकाला रणदिवे रस्ता, राम्यनगरी हाउंसिंग सोसायटी, बिबवेवाडी येथे झेब्रा क्रॉसिंग रुपये 200 आणि नो हेल्मेट रुपये 500 असा दंड लावण्यात आला असून फोटोही देण्यात आले आहेत. मात्र, देण्यात आलेला फोटो स्क्वॉर्पिओ गाडीचा असून त्याला नो हेल्मेटचा दंड लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्क्वॉर्पिओ गाडीचा नंबर आणि प्रत्यक्षात दंड आकारण्यात आलेल्या गाडीचा नंबर वेगवेगळा असल्याचेही समोर आले आहे.
———————–
येथे पाहा तुमचा ऑनलाइन दंड
– punetrafficop.net
——————
दोन प्रकारे लावला जातो दंड
वाहनचालकाला पोलिसांकडून ऑनलाइन आणि मॅन्युअली अशा दोन प्रकारे दंड लावण्यात येतो. हे ओळखण्यासाठी दंड लावलेल्या वाहनाच्या चलन नंबरच्या सुरवातीला जर ptpchc (सीसीटीव्ही) असेल, तर तो दंड सीसीटीव्हीद्वारे लावला असुन त्याला फोटो अनिवार्य आहे. मात्र, दुसऱ्या प्रकारामध्ये वाहतूक पोलिसांनी मॅन्युअली कारवाई करुन दंड लावला असल्यास त्यासाठी चलन नंबरच्या सुरूवातीला ptpchm (मॅन्युअली) असे असते. अशा केसेसमध्ये काही वेळा फोटो दिला जात नसून दंड भरावा लागतो.
———————
यापूर्वी पैसे भरलेल्यांचे काय?
वाहतूक पोलिसांच्या आताही बाब लक्षात आली असूून दंड रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजपर्यंत वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे करण्यात आलेल्या 1 लाख 60 हजार 986 केसेसमध्ये वाहनचालकांनी पैसे भरले आहेत. यामुळे यापैकी किती वाहनचालकांनी फोटो नसतानाही दंड भरला असेल, याविषयी सांगता येणार नाही. दरम्यान, सध्या वाहतूक पोलिसांना सीसीटीव्हीच्या 6 लाख 32 हजार 648 केसेसमध्ये 14 कोटी 89 लाख 65 हजार 400 रुपये दंड वसूल करायचा आहे.
—————————–
वाहतूक पोलिसांकडून कारवाई करताना काही तांत्रिक बाबींमुळे किरकोळ स्वरुपात अशा केसेस झाल्या आहेत. मात्र, सीसीटीव्हीद्वारे कारवाई झाल्यास आणि फोटो दिला गेला नसल्यास वाहतूक शाखेकडून तो दंड रद्द करुन दिला जाईल. मात्र, अनेकदा मॅन्युअली वाहतूक नियमन करताना लावलेल्या दंडाला वाहतूक पोलीसच पुरावा असून त्याविरोधात जर कोणाची तक्रार असेल, तर त्यासाठी त्याला न्यायालयीन लढाई लढावी लागेल.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्‍त, वाहतूक शाखा.
——————–


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)