पुणे – दुर्मीळ चित्रपटांच्या रिळ गहाळ होतातच कशा?

‘कॅग’ने ठपका ठेवल्यानंतर चित्रपट संग्रहालयाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह

पुणे – चित्रपटांच्या वारशाचे जतन करणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडील 31 हजारांपेक्षा अधिक रिळे गहाळ किंवा नष्ट झाली असल्याची माहिती “कॅग’ने अहवालाद्वारे दिली आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात “कॅग’ने हा ठपका ठेवल्याने चित्रपट संग्रहालयाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, इतक्‍या मोठ्या संस्थेतून असा वारसा गहाळ कसा होऊ शकतो, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

देशातील चित्रपटाचा वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 1964 रोजी संग्रहालय उभारण्यात आले होते. संग्रहालयामध्ये चित्रपटांची रिळे, व्हिडिओ कॅसेट, डीव्हीडी, पुस्तके, पोस्टर, प्रेस क्‍लिपिंग, ध्वनिफिती असे 106 वर्षांतील दुर्मीळ चित्रपट साहित्य आहे. देशात केवळ पुणे येथे ही संस्था केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत काम करते, या संस्थेबाबत असा अहवाल आल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

2016-17 मध्ये चित्रपटांची 1 लाख 32 हजार रिळे उपलब्ध होती. संग्रहालयामध्ये 2010 मध्ये माहिती नोंदविण्याचे (डेटा एन्ट्री) काम सुरू झाले. यावेळी चित्रपट साहित्याला बारकोड लावण्याचे काम करण्यात आले. बारकोड लावण्याचे काम केलेल्या ठेकेदाराच्या बिलानुसार 1 लाख 377 रिळे उपलब्ध असल्याचे समोर आले. यादरम्यान, 31 हजारांहून अधिक रिळांचे डबे हरवले किंवा नष्ट करण्यात आल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. कॅगने 1 मे 2015 ते 30 सप्टेंबर 2017 या कालावधीत संग्रहालयातील साहित्याची तपासणी केल्यानंतर ही तफावत उघड झाली. या संदर्भात संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)