पुणे – दहावीसाठी आजपासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध

पुणे – इयत्ता दहावीची परीक्षा पुढच्या महिन्यात होत आहे. या परीक्षेसाठी विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) दि. 30 जानेवारीपासून उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

यंदापासून दहावीच्या परीक्षार्थींना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जात आहे. दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahasscboard.in अथवा www.mahasscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उद्यापासून स्कूल लॉगइनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार माध्यमिक शाळांनी दहावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावेत, असेही राज्य मंडळाने सूचित केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करून शिक्‍का मारावा. हॉल तिकिटात विषय व माध्यम असे बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात करून घेणे आवश्‍यक आहे. तसेच, हॉल तिकिटावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवयाची आहे.

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकवटून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्‍का मारून स्वाक्षरी करावयाची आहे, असे मंडळाने शाळांना सूचना दिल्या आहेत.

शाळांकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात असले तरी त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, अशी सूचना राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. ऑनलाइन हॉल तिकीट प्रथमत: पुणे विभागीय बोर्डाने सुरू केला. त्यांनतर यंदाच्या वर्षी हा प्रयोग राज्यात राबविण्यात येत आहे. हॉल तिकिटासाठी कोणत्याही स्वरूपाचे शुल्क नसेल, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)