पुणे : ‘त्या’ 7 जलतरण तलावांना टाळे

संग्रहित छायाचित्र

पालिकेचा निर्णय


प्रवेश नाकारणाऱ्या ठेकेदारावरही होणार कारवाई

पुणे- महापालिकेच्या मालकीचे सात जलतरण तलाव पोहण्यासाठी असुरक्षित असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर हे सातही तलाव तात्पुरते बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच ज्या तलावांमध्ये सुरक्षासाधने नाहीत, तेथे तातडीने ती उपलब्ध करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत, अशी माहिती मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अनिल मुळे यांनी दिली.

पाण्याचा अंदाज न आल्याने 21 वर्षीय तरुणाला तळजाई टेकडी येथील महापालिका जलतरण तलावात आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर स्थायी समितीने तातडीने पालिकेच्या सर्व तलावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या क्रीडा विभागाने 21 ते 13 एप्रिल या कालावधीत जलतरण तलावांची तपासणी केली. पालिकेच्या मालकीचे 31 जलतरण तलाव असून त्यात 10 बंद आहेत. तर उर्वरीत 21 तलावांमध्ये 4 पोहण्यासाठी सुरक्षित असून 9 सरासरी सुरक्षित आहेत. तर एका तलावाची तपासणी करण्यास महापालिकेस पथकास नकार देण्यात आला होता.

या अहवालाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई सुरू करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने बुधवारी हे सातही तलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ज्या एका ठेकेदाराने पालिकेच्या सुरक्षा पथकास तलावाची तपासणी करण्यास नकार दिला, त्या ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.

तपासणी अहवालच अडचणीत
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांनी 20 एप्रिल रोजी या तपासणी पथकाच्या नेमणुकीचे आदेश काढले. त्यानंतर या समितीमधील बहुतांश सदस्यांना ही माहिती देण्याआधीच क्रीडा विभागाने परस्परच आपल्या तसेच मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे जलतरण तलावांची तपासणी केली. त्याचा अहवाल सादर करताना मात्र, या समितीमधील सदस्यांच्या नावे सादर करण्यात आली आहेत. त्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्याही नावाचा समावेश आहे.

मात्र, डॉ. वावरे यांनी “आपण या तपासणी समितीमध्ये नव्हतोच’, असे सांगत हात वर केले आहे. तर याबाबत महापालिकेच्या क्रीडाधिकारी किशोरी शिंदे म्हणाल्या, “या तपासणीसाठी कमी वेळ असल्याने काही समिती सदस्यांची वाट न पाहता क्रीडा विभागानेच ही तपासणी केली.’ तसेच या समिती सदस्यांसह पुन्हा तपासणी करून अहवाल ठेवणार असल्याचे शिंदे म्हणाल्या. मात्र, या प्रकारामुळे हा तपासणी अहवाल अडचणीत आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)