पुणे ते सातारा ‘पॉवरबाज’ गुफ्तगू

श्रीनिवास पाटील व शरद पवार यांचा एकत्रित प्रवास

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसची लोकसभा मतदारसंघाची मुंबई येथील आढावा बैठक अवघ्या दोन दिवसावर आली आहे. या परिस्थितीत राजकारणापलीकडचे मैत्रीचे बंध जपणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पुण्यातून सातारा पर्यंत एकत्र प्रवास केल्याने पुन्हा राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. सातारा लोकसभा निवडणुकांसाठी खासदार उदयनराजे भोसले यांना पर्याय देण्यासाठी पुन्हा श्रीनिवास पाटलांशी ‘पॉवर’ बाज गुफ्तगु सुरु झाल्याने पवारांची साताऱ्यासाठी राजकीय चाचपणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

-Ads-

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवासाठी शरद पवार साताऱ्यात येणार होते. यावेळी पुण्यातून येताना आपल्या गाडीतून त्यांनी श्रीनिवास पाटील यांनाही सोबत आणले. बारामती होस्टेल ते सातारा आणि वायसी कॉलेज वरून थेट कर्मवीर समाधी परिसरात दोन्ही मित्र एकदमच दाखल झाल्याने पवारांची राजकीय गणिते जाणकारांच्या लक्षात आली.

गेल्या आठवड्यात थोरले पवार साताऱ्यात असताना, श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकांसाठी नव्याने मिशांना पीळ दिल्याने राष्ट्रवादीच्या तंबूत काटामारीचे राजकारण होणार असल्याची चिन्हे आहेत. यानंतर साताऱ्याच्या राजकारणात सातारा ते फलटण अशी बरीच राजेशाही उलथापालथ झाल्याने पवारांचे पुन्हा राजकीय कसब पणाला लागणार आहे.

खासदार उदयनराजे व आमदार यांच्यामध्ये ताणले गेलेले संबंध आणखी विकोपाला गेले, एकमेकांची उनीदुनी पवारांच्या दरबारात निघाली पण राजकीय समेट काही झाला नाही. बारामतीच्या गोविंद बागेपासून ते पुण्याच्या मोदी बागेपर्यंत साताऱ्याचे राजेशाही राजकारण हेलकावतच राहिले. आठ दिवसानंतर बोलू हे पवारांचे आश्वासन घेउन खासदार उदयनराजे साताऱ्यात परतले.

पवारांनी राष्ट्रवादीच्या अंर्तगत वादाचा मुद्दा कितीही टाळला तरी साताऱ्यात भाकरी करपण्यास सुरवात झाल्याचा अंदाज लावला जाऊ लागला आहे. पूर्वीं एका मुलाखतीत पवार यांनी राजे मंडळींचा चिमटा काढला होता. यावेळी राजेपदाचे भान राखले नाही तर सामन्यांना यातना सहन कराव्या लागतात, असे पवार यांनी सुनावले होते. पवारांचा श्रीनिवास पाटलांबरोबरचा प्रवास साताऱ्याच्या राजकारणाला पुन्हा उकळी आणणारा ठरला आहे. आता मुंबईच्या बैठकीत साताऱ्याचे राजकारण काय वळण घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)