पुणे: तिकीट दरवाढीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात

कोणाच्या खांद्यावर, कोणाचे ओझे?
गेल्या काही महिन्यांत इंधन दरात वाढ झाली आहे. त्यामुळे एसटीचा इंधनावरील खर्च वाढला आहे. उत्पन्नाच्या तुलनेत हा खर्च महामंडळाला सध्यातरी परवडणारा आहे. त्यामुळे दरवाढीची शक्‍यता सध्या तरी वाटत नाही. मात्र, एसटी महामंडळाच्या वेतनात वाढ करण्याची आणि त्याची घोषणा येत्या 1 मे रोजी करण्याची ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. त्यामुळे हा खर्च भरुन काढण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांवर दरवाढ लादण्याचे महामंडळ आणि परिवहन विभागाचे नियोजन आहे.

परिवहन मंत्री म्हणतात, “परिवहन विभागाकडे अजून प्रस्ताव नाही’

पुणे – “लालपरी’ म्हणजेच एसटी बसेस तिकीट दरात वाढ होण्याच्या चर्चेला सोशल मीडियातून पेव फुटले होते. महागाईचा आगडोंब उसळला असतानाच राज्य शासन आणि महामंडळाच्या वतीने ही दरवाढ लादली जाण्याच्या शक्‍यतेने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र, या प्रस्तावित दरवाढीची माहिती खुद्द राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाच नसल्याची बाब समोर आली आहे. रावते यांनीही याची जबाबदारी झटकत हा विषय “परिवहन खात्याचा नव्हे, तर महामंडळाचा आहे’ असे सांगत दरवाढीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात टोलविला आहे.

सुट्ट्या आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेऊन एसटी भाडेवाढीचा विषय समोर आला आहे. त्यानुसार 10 ते 15 टक्के दरवाढीचा हा प्रस्ताव आहे. तो राज्य परिवहन आयोगाला पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लालपरी ते वातानुकुलित आणि स्लीपर कोच बसेससाठी ही दरवाढ लागू होणार आहे. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाने नुकतीच दहा मार्गावर स्लीपर कोच बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून एका मार्गावर ही सेवा सुरू करुन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला असतानाच एसटी महामंडळाला दरवाढीचे डोहाळे लागले आहेत.

दरवाढ सुचविण्याचा अथवा तिकिटात वाढ करण्याचा अधिकार हा एसटी महामंडळाला आहे. मात्र, राज्य परिवहन आयोगाची मान्यता मिळाली, तरच ही दरवाढ होऊ शकते. असा प्रस्ताव राज्य परिवहन विभागाकडे अद्याप आलेला नाही. तो आल्यास त्यावर काय निर्णय घ्यायचा, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)