पुणे: … तर तोपर्यंत महाराष्ट्र विकसीत होणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : प्रत्येक समाजाच्या विकासाची योजना तयार करणार

पुणे – महाराष्ट्रातील मराठा आणि बहुजन समाज विकासाकडे जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्र विकसीत होणार नाही. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी सगळ्या समाजाला एकत्रीत घेऊन प्रत्येक समाजाच्या विकासाची योजना तयार करणार असून, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवण्याचे कार्य करू, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या उद्‌घाटनप्रसंगी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी महापौर मुक्ता टिळक, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार महेश काळे, सारथीचे सदानंद मोरे उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मराठा समाजाचे मोठे योगदान आहे. परकीय आक्रमकांच्या विरूद्ध लढा उभारत देव, देश आणि धर्माला सुरक्षित ठेवण्याचे काम मराठा समाजाने केले. असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, 21 व्या शतकातील कॅपीटल हे मानव संसाधन आणि ज्ञान आहे. बदलत्या जगासोबत आपल्यालाही बदलावे लागते. ही बदलाची प्रक्रिया करताना जोपर्यंत संस्था तयार करत नाही तोपर्यंत आपण पाठीमागे राहतो आणि जगाच्या पाठीमागे राहणाऱ्यांचा कधीच विकास होणार नाही. त्यामुळे बदलत्या जगामध्ये “सारथी’ ही संस्था निर्माण करताना सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज शिष्यवृती योजनेच्या माध्यमातून 605 कोर्समध्ये मराठा आणि अन्य समाजाच्या विद्यार्थ्याला फिमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच रोजगारामध्येही सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यात वर्षाला 25 हजार सरकारी नोकऱ्या निघतात. त्यातील तीन ते चार हजार नोकऱ्या मराठा समाजाच्या वाट्याला येतात. त्यामुळे समाजातील बेरोजगारी दुर होवू शकत नाही. समाजामध्ये रोजगाराची निर्मिती करण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुर्नजीवीत केले. त्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

बहुजन समाजाचा उध्दार होत असताना मराठा समाज मागे राहिला. त्याला अनेक कारणे असतील, मात्र त्यामध्ये न पडता बहुजन समाज हा एकत्र राहिला पाहिजे ही छत्रपती शाहु महाराजांची कल्पना होती. त्यामुळे बार्टी पाठोपाठ “सारथी’ची स्थापना केल्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सरकारने केले. मराठा समाजाने काढलेले सर्व मोर्चे हे शिस्तीत आणि शांततेमध्ये पार पडले. त्यावेळी सरकारने जी आश्‍वासने दिली. त्या सरकारवर मराठा समाजाने विश्‍वास दाखवला आहे. मात्र, त्याला विश्‍वासाला तडा जावू नये. दरम्यान, सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीन विकास होण्यास मदत होईल. मात्र, सारथीच्या माध्यमातून जी कामे केली जातील त्याला ठरावीक “टाईम बॉण्ड’ असावा, असेही छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सुचविले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सारथीचे सदानंद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

मुक मोर्चाचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहचला
मराठा समाजाने काढलेले मोर्चे मुक असले तरी, त्याचा आवाज हजारो पटीने मोठा होता. तो आवाज सरकारच्या कानावर पोहोचला आणि मोर्चातील महत्त्वाची असलेली मागणी “सारथी संस्थेची’ पूर्ण करण्यात आली. तसेच अन्य मागण्याही सकारात्मकतेने घेण्यात येत आहे. आरक्षणाचा हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. मात्र, सध्या तो प्रश्‍न न्यायप्रविष्ट झाले. त्यामध्ये न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाची शिफारस मागितली असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले. लवकरच मागासवर्गीय आयोगाची शिफारस न्यायालयाकडे देण्यात येईल. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या रयतेची काळजी घेतले, राज्य कारभारासह अन्य बाबींचे ज्या पध्दतीने नियोजन करून राज्य कारभार चालविला, त्यातील एक टक्का आम्ही घेतले तर आम्ही राज्य सुजलाम सुफलाम करू, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)