पुणे – …तरच थांबेल मानव-बिबट्या संघर्ष!

 “अॅक्‍शन प्लॅन’ फायलीतच


बिबट्याची “झडप’ पुण्यापर्यंत

पुणे – बिबट्यांबाबत जनजागृती, आवश्‍यक साधनसामग्री, प्रशिक्षित पथकाची नेमणूक आणि पाणथळ, कुरण यांसारख्या क्षेत्रांचा विकास असा सर्वसमावेशक “अॅक्‍शन प्लॅन’ दिला असताना, याबाबत कोणतीही कामे पूर्ण झाली नाहीत. हा प्लॅन देऊन तीन वर्षे उलटली, मात्र अजूनही यादिशेने कोणतेही प्रयत्न झाले नसल्याची खंत, मानव-बिबट्या संघर्षाचे अभ्यासक डॉ. विद्या आत्रेय यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा संघर्ष रोखायचा असेल, तर ठोस कृतीची गरज असल्याचे समोर आले आहे.

अत्यंत रहदारीच्या आणि गजबजलेल्या पुणे शहरात मागील पंधरवड्यात दोन ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या चर्चा होत्या. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्‍त वावर असतो. पण, आता सोमवारी बिबट्याने शहरातील मुंढवा भागातच झडप घातली आहे. त्यामुळे मानव आणि बिबट्या हा संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. या संघर्षाबद्दल आत्रेय या गेले अनेक वर्षे राज्यातील अभ्यास करत आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जुन्नर अशा विविध ठिकाणी त्यांनी बिबट्यासंदर्भात बरेच काम केले आहे. याच अनुषंगाने बिबट्यांसोबतचा संघर्ष टाळण्यासाठी राज्यस्तरीय आवश्‍यक कार्यप्रणाली म्हणजेच अॅक्‍शन प्लॅन वनविभागाला सुचविण्यात आला होता. मात्र, सन 2015 मध्ये दिलेल्या या “अॅक्‍शन प्लॅन’ला आज जवळपास तीन वर्षे उलटूनही त्याबाबत फारशी दखल घेण्यात आलेली नाही.

या अॅक्‍शन प्लॅननुसार, बिबट्यांचा वावर असलेल्या आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात बिबट्यांविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्‍यक आहे. विशेषत: शेतकरी आणि कामगार वर्गात जे रात्रीच्या वेळी काम करतात, त्यांना सुरक्षेबबात माहिती देणे आवश्‍यक आहे. तसेच बिबट्यांसोबत होणारा संघर्ष लक्षात घेता प्रत्येक गावात एक प्रशिक्षित टीम नेमणे आवश्‍यक आहे. याव्यतिरिक्त बिबट्यांचा वावर असलेल्या क्षेत्राचा अभ्यास करून त्याचे नकाशे विकसित करणे, पाणथळ, कुरण आणि गवताळ प्रदेशांचा विकास करणे यादेखील बाबींचा समावेश आहे. मात्र, वनविभागाकडून अजूनही हा प्लॅन दुर्लक्षितच राहिला आहे.

भटकी कुत्री, कचऱ्यामुळेच बिबट्यांना आमंत्रण
बिबट्या हा स्वभावाने भित्रा प्राणी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. तसेच बिबट्यासाठी कुत्री, मांजर, डुकरे यांसारखे प्राणी अन्न म्हणून पुरेसे ठरतात. त्यामुळे शहरी भागात भटकणारी मोकाट कुत्री हे या बिबट्यांसाठी आयतं खाद्य असल्याने त्यांचा माग काढत बिबटे शहरी भागात येतात. याव्यतिरिक्त जागोजागी असणारे कचऱ्याचे ढिग, त्यावर फिरणारी डुकरी, उंदीर, घुशीहेदेखील बिबट्यांचे खाद्य असून, त्यांना खाण्यासाठी बिबट्या येतो, अशी माहिती जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यक अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली.

सुरक्षेसाठी काय केले पाहिजे?
– बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये, त्वरित वनविभागाला कळवावे.
– बिबट्याचा पाठलाग केल्यास तो उलटा फिरून तुम्हाला इजा करू शकतो.
– जखमी किंवा अडकलेला बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये.
– बिबट्या तुमच्या घराकडे येतो, तो तुमच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करण्यासाठी. त्यामुळे आपल्या पाळीव प्राण्याला बंदिस्त गोठे बांधल्यास बिबट्या फिरकणार नाही.
– उघड्यावर शौचास जाऊ नये.
– बिबट्या वावर क्षेत्रात घराबाहेर बाहेर झोपू नये.
– बिबट्या वावर क्षेत्रात दिवे असावेत.
– बिबट्या आपल्या डोळ्याच्या रेषेत खाली असलेल्या भक्ष म्हणून हल्ला करतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)