पुणे: तब्बल 10 वर्षांनंतर वकिलाला मिळाला न्याय

पोलिसांवर कारवाई करा : राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश

शासनाने द्यावी पाच लाख रुपये नुकसानभरपाई

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागणाऱ्या वकिलाच्या घरात घुसून त्यांची पत्नी व लहान मुलीला मारहाण केल्याप्रकरणी गृह विभागाने संबंधित वकिलाला पाच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच मारहाण करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. या प्रकरणाचा निकाल मिळण्यासाठी या वकिलाला तब्बल 10 वर्षे वाट पाहावी लागली आहे.

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एम. ए. सैद यांनी हा निकाल दिला. ऍड. राजेंद्र शिंदे यांची दोन वर्षांची मुलगी व पत्नीला पोलिसांनी शिंदे यांच्या घरात घुसून बेदम मारहाण केली होती. 5 ऑक्‍टोबर 2008 रोजी शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या फोटोझिंको प्रेसच्या कॅन्टिन व पार्किंगच्या कंत्राटाबद्दल माहिती मिळविण्यासाठी ऍड. शिंदे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल केला होता. जया शेट्टी नावाची व्यक्ती तिथे अनधिकृतपणे पैसे वसूल करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. त्यामुळे शेट्टी यांनी चिडून शिंदे आपल्याला शिवीगाळ करतात, अशी तक्रार बंडगार्डन पोलिसांकडे दाखल केली होती. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक रणदिवे हे शिंदे यांना या प्रकरणात अटक करण्यासाठी न्यायालयात पोहोचले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या वकिलांनी शिंदे यांना साथ दिली. शिंदे यांना अटक करण्यासाठी रणदिवे यांच्याकडे मुख्य जिल्हा न्यायाधिशांची परवानगी नाही तसेच त्यांचा गणवेश नाही किंवा ओळखपत्रही नसल्याने वकिलांनी रणदिवे यांना घेराव घातला. त्यांनी रणदिवे यांना थेट मुख्य जिल्हा न्यायाधीश अशोक चिमा यांच्यापुढे हजर केले.

रणदिवे आणि शिंदे यांचे म्हणणे लेखी देण्यास सांगण्यात आले. त्यावेळी रणदिवे यांनी “शिंदे यांना अटक करण्यासाठी आलो होतो, वकिलांनी मला धक्काबुक्की व मारहाण केली,’ असे सांगितले. मुख्य जिल्हा न्यायाधीश चिमा यांची परवानगी नसताना शिंदे यांना ते कसे अटक करू शकतात? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला असता, त्यांना स्पष्टीकरण देता आले नाही. चिमा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना दिले होते. या प्रकारामुळे चिडलेल्या रणदिवे यांनी बदला घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची फौज घेऊन रणदिवे हे शिंदे यांच्या घरी गेले. शिंदे व त्यांची पत्नी व मुलगी यांना मारहाण केली. या घटनेवरून पोलीस व वकिलांमध्ये त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या मारहाणीविरुद्ध शिंदे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली होती. या प्रकरणाचा दहा वर्षांनंतर निकाल लागला.

काय म्हटले आहे आदेशात…
शिंदे यांना सहा आठवड्यांत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, असा राज्य मानवाधिकार आयोगाने गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी आदेश दिला. अर्जदार ऍड. राजेंद्र शिंदे यांच्यातर्फे ऍड. राजन देशपांडे, व ऍड. सतीश कांबळे यांनी काम पाहिले. दत्तवाडी, बंडगार्डन व शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील ज्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्या घरात घुसून त्यांना व कुटुंबीयांना मारहाण केली होती, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे आदेशही सैद यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)