पुणे: डॉक्‍टर, नर्सवर गुन्हा दाखल करा

सदस्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
डॉ. बागडे आणि डॉ. बडे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांपुढे ठेवल्याचे उपआरोग्य अधिकारी अंजली साबणे यांनी सभागृहात सांगितले. यावरून सभागृहात अधिकच गदारोळ झाला. घटना घडून चार दिवस उलटले आहेत. वास्तविक ही कारवाई चार दिवस आधीच होणे अपेक्षित होते. ते का केले नाही, असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. केवळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितल्यानंतर सदस्य अधिकच आक्रमक झाले. त्यातून महिला सदस्या महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेत आल्या आणि कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. सर्व पुरुष सदस्यांनीही त्यांना पाठिंबा देत प्रशासनाच्या विरोधात उभे राहिले.

गर्भवती, अर्भकाच्या मृत्यूचे मुख्यसभेत पडसाद
महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयातील प्रकरण

पुणे – महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्या मृत्यु प्रकरणाचे पडसाद सोमवारी महापालिका मुख्यसभेत उमटले. संबंधित डॉक्‍टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात यावीच परंतु त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महापालिकेने दाखल करावा अशी मागणी करत सर्वपक्षीय सदस्यांनी महापालिका मुख्यसभेत जोरदार घोषणाबाजी केली. अखेर संबंधित दोन डॉक्‍टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्‍टरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

डॉ. मनोज बगाडे आणि डॉ. विजय बडे असे निलंबित करण्यात आलेल्या डॉक्‍टरांची नावे आहेत. राजीव गांधी रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या शुभांभी जानकर यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांच्यासह बाळाचाही मृत्यु झाल्याची घटना गुरूवारी घडली होती. या प्रकरणाचे पडसाद सोमवारी मुख्यसभेत उमटले. मुख्यसभेला सुरूवात झाल्यानंतर नगरसेविका आश्‍विनी लांडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. संबंधित डॉक्‍टर आणि नर्सवर केवळ निलंबनाची कारवाई करू नये तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महापालिका प्रशासनाने दाखल करावा अशी मागणी शिवसेना गटनेते संजय भोसले आणि कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहात केली.
अखेर सभापतीपदी असलेल्या उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी त्यासंबधीचे आदेश दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी डॉ. बडे आणि डॉ. बगाडे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची घोषणा केली. तसेच त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असेही सभागृहात स्पष्ट केले.

अविनाश साळवे, नंदा लोणकर, गोपाळ चिंतल, शीतल सावंत, राणी भोसले, पृथ्वीराज सुतार, मनिषा लडकत, दीपक मानकर, वासंती जाधव, स्वप्नाली सायकर, प्रवीण चोरबेले, अजय खेडेकर, निलीमा खाडे, अल्पना वर्पे, ज्योत्स्ना एकबोटे, सुजाता शेट्टी, अनिता कदम, वैशाली बनकर, विशाल तांबे, कर्णे गुरूजी, राजश्री शिळीमकर, राजश्री काळे, दीपाली धुमाळ, प्रशांत जगताप, पल्लवी जावळे आदींनीही तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच प्रभागातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये घडणाऱ्या घटनांविषयीही तक्रारी केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)