पुणे: “डीबीटी’चे 9 कोटी रु. अखेर जमा होणार

संग्रहित छायाचित्र

स्थायी समिती बैठकीत प्रशासनाची माहिती 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – महापालिका शाळांमधील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या सुमारे 49 हजार 683 मुलांच्या बॅंक खात्यात शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीची सुमारे 8 कोटी 93 लाख रूपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले तरी मुलांच्या खात्यात ही रक्कम अद्याप जमा झालेली नसल्याची बाब दैनिक “प्रभात’ ने “शालेय साहित्य वाटपाची शाळा’ या वृत्ताद्वारे उघडकीस आणली होती. त्याची दखल घेत स्थायी समिती सदस्या मंजूषा नागपूरे यांनी याबाबत समितीच्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित करत, रक्कम जमा न झाल्याने पालकांमध्ये संभ्रम असल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी ही रक्कम मंगळवारी रात्रीपर्यंत जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालकांनो, आजपासून मिळणार रक्‍कम
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्राथमिक विभागांच्या शाळांमध्ये सुमारे 84 हजार 433 मुले आहेत. त्यातील 41 हजार 977 मुलांची बॅंक खाती असून उर्वरीत खाती अजून काढलेली नाहीत. तर, ज्यांची खाती आहेत त्यातील 15 हजार 716 मुलांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. माध्यमिक विभागाकडे 12 हजार मुलांची नोंद असून त्यातील 8 हजार मुलांची बॅंक खाती आहेत. त्यावर शाळा सुरू होण्यापूर्वी अनुदान जमा होणे अपेक्षित होते. अखेर ही रक्कम उद्या (बुधवार) पासून पालकांना बॅंकेतून काढून त्याद्वारे शालेय साहित्य खरेदी करता येणार आहे.

50 टक्के मुलांचीच खाती
दरम्यान, ही रक्कम प्रशासनाकडून जमा केले जाणार असली तरी ती केवळ 50 टक्के मुलांचीच आहे. पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळांमध्ये एकूण 96 हजार 433 मुले आहेत. त्यातील केवळ 49 हजार मुलांनाच तूर्तास ही रक्कम मिळणार आहे. तर उर्वरीत मुलांची बॅंक खाती नसल्याने तसेच काहीच्या खात्याची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असल्याने उर्वरीत मुलांना साहित्य खरेदीसाठी अनुदान कधी मिळणार हे प्रशासनालाही सांगता येत नसल्याचे चित्र आहे.

महापालिका शाळांमधील मुलांना यंदापासून शैक्षणिक साहित्य तसेच गणवेशासाठीचे अनुदान थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे. ही रक्कम प्रशासनाकडून शाळा सुरू होण्यापूर्वी मुलांच्या खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले होते तर स्थायी समितीने ज्या वेळी या प्रस्तावास मान्यता दिली. त्यावेळी शाळा सुरू झाल्यानंतर सर्व मुलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असेल असे स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात अनुदान वाटपाचे पैसे खात्यात जमा करण्यासाठी ज्या मुलाचे बॅंक खाते आहे, त्याची माहिती पालिकेच्या “डीबीटी’ पोर्टलवर भरणे आवश्‍यक होते. मात्र, या पोर्टलवर माहितीच “अपलोड’ होत नाही, तर जी माहिती “अपलोड’ होते ती दिसत नाही, अशी तक्रार मुख्याध्यापक करत होते. तर वेबपोर्टलमध्ये कोणत्याही चुका नसून ही माहिती भरण्यास मुख्याध्यापकच दिरंगाई करत असल्याचा दावा संगणक आणि सांख्यिकी विभाग करत होता. मात्र, या गोंधळात मुले शाळेत जुनाच गणवेश आणि जुनेच शैक्षणिक साहित्य घेऊन हजेरी लावत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)