पुणे: “डीपी’साठी स्वतंत्र कक्ष!

महापालिकेच्या अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या विभागांमधील रिक्‍त जागा तातडीने भरण्यात याव्यात, यासाठी राज्यशासनाकडे 2015 पासून प्रस्ताव पाठविले आहेत. या जागा तातडीने भरल्या जाव्यात, यासाठी प्रशासनासह भाजप पदाधिकाऱ्यांकडूनही शासनास विनंती केली आहे.
– श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते.

आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी सहा महिन्यांत “टीडीआर’ देणार
वेळेत अंमलबजावणी करण्याच्या महापौरांच्या सूचना

पुणे – राज्यशासनाने जानेवारी 2017 मध्ये मान्यता दिलेल्या शहराच्या “डीपी’अर्थात विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याच्या सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या. आरक्षणांच्या जागा तातडीने ताब्यात मिळाव्यात, यासाठी सहा महिन्यांत “टीडीआर’ दिला जाईल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या मुद्यांवर होणार तातडीने कार्यवाही
– सुमारे 200 ते 250 कर्मचाऱ्यांच्या जागा येत्या काळात भरल्या जाणार.
– जायका प्रकल्पाला गती देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची मागणी.
– रस्ते खोदाईसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना
– समान पाणी योजनेच्या टाक्‍यांच्या कामासाठी आवश्‍यक भूसंपादन
सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

-Ads-

महापालिकेच्या 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील प्रस्तावित योजनांचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. यात या सूचना दिल्याची माहिती महापौर टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.

महापौर म्हणाल्या, शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी आराखडा तयार केला जातो. मात्र, त्यात प्रस्तावित आरक्षणे वर्षानुवर्षे ताब्यात येत नाहीत. तसेच जे जागा मालक आरक्षणाच्या जागा ताब्यात देण्यास तयार असतात, त्यांना मोबदला म्हणून दिला जाणारा “टीडीआर’ मिळण्यासाठी मोठा कालावधी जातो. अशा स्थितीत जागा मालकांना “टीडीआर’ सहा महिन्यांत मिळाल्यास जास्तीत जास्त जागा ताब्यात येऊन विकास आराखड्याची अंमलबजावणी वेगाने करता येईल. त्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणे आणि सहा महिन्यात “टीडीआर’ देण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, घनकचरा, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलामधील अनेक जागा रिक्‍त आहेत. त्या भरण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. या बैठकीस स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शितल-उगले यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

शिवसृष्टी जागेची मोजणी, सर्व्हेक्षण करा

शिवसृष्टीच्या जागेची मोजणी आणि सर्व्हेक्षण करण्याविषयी प्रशासनाला सूचना दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. शिवसृष्टी विषयात 16 एप्रिल रोजी आमदार आणि पालकमंत्री यांच्याबरोबर बैठक घेण्यात येणार होती. मात्र आमदारांशी याविषयावर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्याप्रमाणे चांदणी चौकाजवळील बीडीपीच्या जागेचे सर्व्हेक्षण आणि पाहणी करून त्याचा अहवाल एक आठवड्यात देण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत, असे भिमाले म्हणाले. जमीन मालक किती आहेत, किती जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच त्या जागांच्या मोबदल्यात देण्यात येणारा टीडीआर अथवा रक्‍क्‍कम किती आहे याचीही माहिती अहवालात नमूद करण्याविषयी सूचना करण्यात आल्याचे भिमाले म्हणाले.

भाम-आसखेडचे पाणी 2020 मध्ये मिळणार

भामा-आसखेड योजनेमधून शहराच्या पूर्व भागाला पाणी मिळण्यासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2019 पर्यंत वेळ जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले, असे महापौर टिळक म्हणाल्या. त्यामुळे या योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाल्याचा प्रशासनाने या पूर्वी केलेला दावा फोल ठरला आहे. त्यामुळे या पाण्यासाठी पुणेकरांना आणखी 2 वर्षांची वाट पाहवी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनेतून शहरासाठी सुमारे 2.18 टीएमसी पाणी मिळणार आहे. या कामासाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा खर्च असून केंद्रशासनाच्या “जेएनएनयूआरएम’ योजनेतून हे काम केले जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)