पुणे: डीएसके प्रकरणातील तपास अधिकारी अचानक रुग्णालयात

छातीत दुखत असल्याने उपचार सुरू

पुणे- डी.एस.कुलकर्णी प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) नीलेश मोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी.एस.के दाम्पत्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्या इतर नातेवाईकांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या डीएसके दांम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. तर दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा शिरीष याने न्यायालयापुढे शरणागती पत्करली. याप्रकरणी अनेक महत्वाची कागदपत्रे तसेच डीएसकेंची आलिशान वाहने जप्त करण्यात आली आहेत. या तपासात अनेक बड्या व्यक्ती अडकल्याचे निष्पन्न झाले. यामुळे तपासाचा मोठा ताण मोरे यांच्यावर मागील काही दिवस होता. यातच बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह काही बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र मराठेंच्या अटकेनंतर केंद्रीय पातळीवरुन सूत्रे हलल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनीच पुणे पोलिसांची झाडाझडती घेतली. मराठेंची अटक बेकायदा असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांच्या अटकेसंदर्भात आरबीआय किंवा मुख्यमंत्र्यांना कोणतीच माहिती दिली नसल्याचेही आरोप झाले. या आरोपांमुळे पोलीस बॅकफुटवर गेले. तपासाचे श्रेय मिळण्याऐवजी राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात पोलिसांवर निर्माण झाला. याचेच प्रत्यय गुरुवारी न्यायालयात आले. जामिनाबाबत विशेष सरकारी वकिल व पोलिसांमध्ये एकमत नसल्याचे दिसले. पोलिसांनी अटी व शर्थीवर तिन्ही अधिकाऱ्यांना जामीन द्यावा असे म्हणणे न्यायालयात मांडले. मात्र, तिघांच्या जामिनास आपला विरोध असल्याचा युक्‍तीवाद विशेष सरकारी वकिलांनी केला. यामुळे एकंदरच डीएसके प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)