पुणे -‘डबल ड्युटी’ला चालकच वैतागले

पुणे – एसटी महामंडळाला चालकांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे त्याचा प्रवासी सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यावर चालकांना “डबल ड्युटी’ करायला लावली जात आहे. विशेष म्हणजे त्यांना त्याचा नियमांनुसार “ओव्हरटाइम’ही दिला जात नाही. त्याचा परिणाम या चालकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे, त्यामुळे हे चालक त्रस्त झाले आहेत.

एसटी महामंडळाच्या राज्यभरात 19 हजार 500 बसेस आहेत. पण, प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यास महामंडळाला सपशेल अपयश आले आहे. इतक्‍या बसेस असतानाही महामंडळाकडे अवघे 15 हजार चालक आहेत. त्यामुळे या चालकांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनेच्या वतीने महामंडळ प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने त्याची अद्याप पूर्तता केलेली नाही.

चालकांची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम बसेसच्या फेऱ्यांवर होत आहे, त्यामुळे बहुतांशीवेळा काही फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की संबंधित डेपो व्यवस्थापक अथवा वाहतूक नियत्रंकावर येत आहे. त्यातूनच प्रवाशांचा रोष अधिक वाढत असून महसूलही घटत आहे, त्यावर उपाय म्हणून काही वाहतूक नियत्रंक काही चालकांवर दबाव आणून त्यांना “डबल ड्युटी’ करायला भाग पाडत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे तब्बल बारा ते पंधरा दिवस ड्रायव्हिंग केल्याने हे चालक अक्षरश: त्रस्त झाले आहेत.

यासंदर्भात एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या विभागीय नियत्रंक यामिनी जोशी म्हणाल्या, चालकांना “डबल ड्युटी’ची सक्ती करण्यात येऊ नये. असा आदेश सर्व आगार प्रमुखांना देण्यात आला आहे. तरीही, असे प्रकार घडत असतील तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)