पुणे – “टीईटी’ ला मुहूर्त कधी?

परीक्षा आणखी लांबणीवर; उमेदवारांत नाराजी

पुणे – राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला अद्याप अंतिम मान्यताच दिलेली नाही. यामुळे आता ही परीक्षा मार्चमध्ये घेणे शक्‍य होणार नाही. ही परीक्षा आणखी लांबणीवर पडणार असल्याचे उघड झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या कायमस्वरूपी नोकरीसाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घालण्यात आले आहे. वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून अगदी सुरुवातीला करण्यात आले होते; परंतु ही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी 15 जुलैला परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर अद्याप परीक्षाच घेण्यात आलेली नाही.

परीक्षा परिषदेकडून 18 सप्टेंबर, 2018 ला “टीईटी’ परीक्षा घेण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. 4 ते 5 महिने झाले तरी अद्याप शासनाकडून त्यावर मान्यता देण्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हा प्रस्ताव शासनदरबारी धुळखात पडलेला आहे. शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून डिसेंबरमध्ये परीक्षा कधी घेता येईल याबाबतची विचारणा परीक्षा परिषदेकडे करण्यात आली होती. त्यावर परीक्षा मार्चमध्ये घेण्याची तयारी परीक्षा परिषदेने दर्शविली होती. त्याबाबत शासनाला माहितीही कळविण्यात आली होती.

13 फेब्रुवारी, 2013 नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना 31 मार्च, 2019 पूर्वी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. अन्यथा या शिक्षकांना नोकरी गमवावी लागणार आहे. यामुळे या शिक्षकांची परीक्षा कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.

परिषदेच्या वतीने 24 फेब्रुवारीला इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाही फेब्रुवारी व मार्चमध्ये होणार आहेत. या परीक्षांच्या कामकाजात सर्व यंत्रणा गुंतणार आहे. या कारणांमुळे आता मार्चमध्ये परीक्षा घेणे शक्‍य होणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. “टीईटी’ परीक्षा घेण्याची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे आता 2 महिन्यांच्या कालावधीत या परीक्षचे नियोजन शक्‍य होणार नाही. आता लवकर मान्यता मिळाल्यास एप्रिलमध्ये परीक्षा घेता येईल, असेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)