पुणे : टिळेकरांसह साथीदारांवर गुन्हा दाखल करा

लष्कर न्यायालयाचे आदेश


अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार

पुणे – तरुणाचे अपहरण करून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केल्याप्रकरणी लष्कर न्यायालयाने आमदार योगेश टिळेकर यांच्यासह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. कोकाटे यांनी असे आदेश दिले आहेत. यापुर्वी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. यामुळे फिर्यादी यांनी ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यावर न्यायालयाने असे आदेश दिले आहे.

योगेश लक्ष्मण कामठे (32, रा. कोंढवा बुद्रुक, भोलेनाथ चौक) यांनी आमदार योगेश पुंडलिक टिळेकर, त्यांचे बंधू चेतन पुंडलिक टिळेकर (दोघेही रा. टिळेकर हाऊस, कोंढवा बुद्रुक), आनंद देशमुख (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक), गणेश मेमाणे व इतर साथीदारांविरूध्द न्यायालयात ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती.

यामध्ये दाखल तक्रारीनुसार, योगेश कामठे यांचा मित्र अतुल गीते यांना आमदार टिळेकर यांचा बंधू चेतन टिळेकर यांनी घरी बोलावून मारहाण केली होती. तसेच, योगेश कामठेच्या आई वडीलांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यावर कोंढवा पोलिसांत तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. यानंतर 1 मार्च 2018 रोजी महेश कामठे आपल्या मित्रांबरोबर पोलिसांत फिर्याद देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना आमदार टिळेकर यांचा अर्वाच्च भोषेत शिवीगाळ करणारा फोन आला.

तसेच, गुन्हा दाखल करू नये यासाठी धमकी दिली होती. त्यानंतर चेतन टिळेकर यांनी आपल्या साथीदारांसह योगेश कामठे यांचे फोर्च्युनरमधून अपहरण केले. अपहरण करून डोक्‍याला पिस्तुल लावून धमकावल्याचे त्याचबरोबर डोक्‍यात जड वस्तूने मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते. तसेच, या प्रकारामध्ये तक्रारदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करणे गरजेचे आहे, यामध्ये पोलीस तपास होणे गरजेचे आहे. पोलिसांनी यामध्ये कोणतीही तक्रार न घेतल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठाण्याची वेळ आली असल्याचे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)