पुणे : जॅमर लावलेले टायर काढले

पुणे- अनधिकृतपणे गाडी पार्क केलेल्या चारचाकीच्या टायरला वाहतूक पोलिसांनी जॅमर लावला. यावर गाडीचालकाने शक्‍कल लढवत स्टेफनीच्या सहाय्याने गाडीचे टायर काढून दुसरे टायर लावले. मात्र, टायर डिक्‍कीत टाकून तेथून निघण्याच्या आतच वाहतूक पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. बुधवारी दुपारच्या सुमारास फर्ग्युसन रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी गाडीचालकावर डेक्‍कन पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आले आहे.

कमलेशकुमार शुक्‍ला (41, रा. कोरेगाव पार्क), असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्‍कन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेशकुमार याने फर्ग्युसन रस्त्यावरील वैशाली हॉटेलसमोर चारचाकी डबल पार्किंग केली. अनधिकृत गाडीची पार्किंग केल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला जॅमर लावले. मात्र, गाडीचालकाने शक्‍कल लढवून वाहतूक पोलिसांनी जॅमर लावलेला टायरच स्टेफनीने काढून टाकला. आणि गाडीतील दुसरे पर्यायी टायर गाडीला लावला. परंतु हे सर्व करत असताना डेक्‍कन वाहतूक पोलिसांपर्यंत ही गोष्ट पोहचली.

यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी जॅमर लावलेले टायर डिक्‍कीत टाकून चोरुन घेऊन जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चालकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास डेक्‍कन पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर. ए. कोळंबीकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)