पुणे जिल्ह्यात “संकल्प स्वच्छतेचा, स्वच्छ महाराष्ट्राचा’ अभियान

पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) – येत्या 15 ऑगस्टपासून पुणे जिल्ह्यात “संकल्प स्वच्छतेचा, स्वच्छ महाराष्ट्राचा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन करून 100 टक्के शौचालयाचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढणे, कलापथकाचे कार्यक्रम आयोजित करणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत परिसर व पाणी साठवणूक ठिकाणी स्वच्छ करणे यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार “संकल्प स्वच्छतेचा, स्वच्छ महाराष्ट्राचा’ हे अभियान राज्यात राबविले जाणार आहे. हे अभियान 15 ऑगस्ट ते 2 ऑक्‍टोबरपर्यंत पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्हा हागणदारी मुक्त जिल्हा झाला आहे. या जिल्ह्यात 100 शौचालये बांधण्यात आली आहेत. परंतु, नागरिकांना त्याचा नियमित वापर करण्यावर भर द्यावा हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासंदर्भात नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे. त्या करिता पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करणे, सनियंत्रण समिती गठीत कऱणे, हागणदारी मुक्त गावांचा सत्कार करणे, स्वच्छता विषयक जनजागृती करणारे पोस्टर्स लावणे यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने दिली.

दरम्यान, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम व त्याचा वापराद्वारे संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे अभियान देशभर राबविले जाते आहे. या अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने राज्य सरकारला काही आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार बांधलेल्या शौचालयाचा नियमित वापर करण्यासाठी “खुले मे शौच से आझादी’ हे विशेष अभियान राबविला जाणार आहे. या अभियानाबरोबर महाराष्ट्रात “संकल्प स्वच्छतेचा, स्वच्छ महाराष्ट्राचा’ हे अभियान राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका तसेच गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये ग्रामस्थांचा सहभाग घेण्यात येणार आहे. गावपातळीवर ग्रामसभा भरवून स्वच्छता, शौच्छालय याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)