पुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये उद्या बंद

जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या सर्व शाळा महाविद्यालयांना सूचना

पुणे,दि.8 – गुरुवारी राज्यभरात मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये व सर्व विद्यापीठे बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. रस्तोरस्ती मोर्चे व आंदोलने केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे वाहतूकीस अडथळा येण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्‍न उद्भवू शकत असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह अन्य अभिमत विद्यापीठांनाही विद्यापीठे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा शाळा व महाविद्यालय बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास अन्य दिवशी पूर्ण करुन घ्यावा असेही जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांना सांगण्यात आले आहे. याबाबत पालिकेनेही पत्र काढत सर्व शाळा बंदच्या सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना झालेला श्‍वसनाचा त्रास
30 जुलै रोजी चाकण येथे झालेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक व खासगी अशा 70 ते 80 गाड्यांचे नुकसान झाले होते. तसेच 2 स्कूलबस जाळल्याबाबतही अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना श्‍वास घेण्यास त्रास होऊन त्यांची सुरक्षितता धोक्‍यात आल्याचेही अहवालत नमूद असल्याने खबरदारीच्या दृष्टीकोनातून हा शाळा व महाविद्यालय बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)