पुणे जिल्ह्यातील भूजलपातळी घटली

सहा तालुक्‍यांतील स्थिती : सर्वाधिक घट बारामती तालुक्‍यात

पुणे – भूजलातील पाण्याचा वाढता उपसा तसेच पावसाने दिलेली ओढ यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमधील भूजल पातळीत घट झाली आहे. यामध्ये भूजल पातळीत सर्वाधिक घट बारामती तालुक्‍यात नोंदविण्यात आली आहे. बारामतीमध्ये भूजल पातळीत 2.23 मीटर इतकी घट झाली आहे. इंदापूर तालुक्‍यामध्ये भूजल पातळी 2.08 मीटरने तर पुरंदरमध्ये 1.82 मीटरने पाणीपातळी खोल गेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत दर तीन महिन्यांनी भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. या नोंदीतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील भूजल पातळीत झालेली वाढ, तसेच घट समजते. भूजल विभागाने नुकत्याच घेतलेल्या नोंदीत जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे. इंदापूर आणि बारामती तालुक्‍यात पाणीपातळी अधिक घट झाली असल्याचे दिसून येते. बारामतीमध्ये पाणीपातळी साडेसहा फूट खाली गेली आहे तर इंदापूरमध्ये सहा फूट पाणीपातळी गेली आहे.

पाणीटंचाईवर मात करण्याकरिता भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात झालेल्या पर्जन्यमानानुसार भूजल पातळीत वाढ होते. पावसाळ्यानंतर भूजलाच्या वापरानुसार हा भूजल संचय कमी होतो व परिणामत: पाण्याच्या पातळीत घट होत असल्याचे भूजल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

निरीक्षण विहिरींद्वारे नोंदी…
भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता जिल्ह्यात 192 विहिरी निश्‍चित केल्या आहेत. यात 71 कूपनलिकांचा समावेश आहे. कूपनलिकांची जल पातळी तीन महिन्याला नोंदविली जाते. तर विहिरींची जल पातळी दर तीन महिन्यांनी नोंदविली जाते. पाणलोट क्षेत्रांनुसार भूजल नोंदणीची ठिकाणे ठरविली जातात. या कूपनलिकामधील पाण्याचा उपसा केला जात नाही.

सात तालुक्‍यांत पातळी वाढली
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्‍यातील भूजल पातळीत 1 मीटर पर्यंत घट झाली आहे. तर पुरंदर आणि शिरूर तालुक्‍यातील भूजल पातळीत 1 ते 2 मीटरपर्यत घट झाली आहे. तर बारामती, दौंड आणि इंदापूर या तालुक्‍यातील भूजल पातळीत 2 ते 3 मीटरपर्यंत घट झाली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने नोंदविलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्याचबरोबर आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी आणि वेल्हे तालुक्‍यांमध्ये पाणीपातळीत 1 मीटरपर्यत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

आठ तालुक्‍यांमध्ये कमी पाऊस
पुणे जिल्ह्यात 13 तालुके मिळून जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण सरासरी 10 हजार 36 मिमी पाऊस पडतो. यंदा जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत जिल्ह्यात सरासरी एकूण 10 हजार 644 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये आंबेगाव आणि पुरंदरमध्ये 20 ते 30 टक्‍यांपर्यंत पर्जन्यमानात तूट झाली आहे. तर बारामती, इंदापूर, हवेली आणि वेल्हा या तालुक्‍यांमध्ये 30 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत तूट झाली आहे. दौंड आणि शिरूर या दोन तालुक्‍यांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पर्जन्यमानात तूट झाली आहे. एकूण आठ तालुक्‍यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. तर खेड तालुक्‍यामध्ये 20 टक्के जादा पाऊस, जुन्नरमध्ये 20 ते 30 टक्के जादा पाऊस, मुळशी मध्ये 30 ते 50 टक्के जादा पाऊस आणि भोर आणि मावळ या तालुक्‍यांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे. यंदा पर्जन्यमानात पाच तालुक्‍यांमध्ये वाढ झाली असल्याची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)