पुणे जिल्हा: साखर होणार निर्यात

20 लाख टन साखर होणार निर्यात…

सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दराने निर्यात करून तोटा होणार असला तरी 20 लाख टन साखर देशाबाहेर जाणार असल्याचे स्थानिक बाजारातील साखर दरातील वाढ व शुल्लक विरहित मिळणारा लाभ लक्षात घेता साखर कारखान्यांची आर्थिक घडी सुस्थितीत येणार आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी यांना समाधानकारक ऊस दर देता येणार आहे, असे राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.

केंद्र शासनाकडून कारखान्यांना कोटा व आयात परवान्याचा निर्णय

मंचर – साखर निर्यातीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेताना कारखान्यांकरिता एप्रिल ते सप्टेंबर 2018 निहाय निर्यात कोटा व तो पूर्ण करणाऱ्या कारखान्यांना ऑक्‍टोबर 2019 ते सप्टेंबर 2021 दरम्यान शून्य टक्के व्याज दराने कच्ची साखर आयातीचा परवाना देण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून एकाच दिवशी घेण्यात आल्याने अडचणीतील साखर उद्योगाकरिता ही खऱ्या अर्थाने महत्वाची बातमी असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष, आमदार वळसे पाटील यांनी सांगितले.

देशातील साखर उद्योगाला व पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने एकाच दिवशी घेतले आहेत. हे निर्णय स्वागतार्ह असून देशातील सर्व 254 सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे आम्ही या निर्णयाबाबत केंद्र शासनाने अभिनंदन करतो, असे महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ, दिल्ली यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुराव्यामुळे हे निर्णय केंद्र शासनाने उशिरा का होईना घेतले असल्याचेही आमदार वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
देशासह राज्यांत समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे व परतीच्या पावसामुळे उभ्या उसाचे वजन व साखरेचे प्रमाण वाढले. त्यामुळे हंगामापूर्वी केलेल्या 251 लाख टन साखर उत्पादनाच्या अंदाजापेक्षा 45ते 50 लाख टनांची साखर जास्त तयार झाली. हंगाम सुरुवातीच्या 40 लाख टन शिलकीत 295 ते 300 लाख टन नव्या साखरेची भर पडली. त्यामुळे देशपातळीवर 335 ते 340 लाख टन इतकी प्रचंड उपलब्धता होऊन त्यातून 255 लाख टनांचा स्थानिक खप वजा जाता हंगाम अखेर 80 ते 85 लाख टनांची शिल्लक राहणार असल्याचे केंद्र शासनाच्या अन्न व वाणिज्य मंत्रालयाचे लक्ष राष्ट्रीय सहकारी महासंघाने सर्वप्रथम वेधले होते व त्यानंतर निर्याती संदर्भातील निर्णयांकरिता पाठपुरावा करण्यात येत होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)