पुणे जिल्हा: सरकारी शिक्षकांची मुले गिरवतात खासगी शाळेचा धडा

गुरुजी तुम्ही लई हुश्‍शार!
शिक्षक हे आपल्या अध्यापनातून विद्यार्थी घडवण्याचे काम करतात. मात्र आपण शिकवत असलेल्या शाळेत आपला पाल्य शिकवण्याची त्यांची मानसिकता होत नाही. मग शाळेला शैक्षणिक दर्जा नाही? की त्यांना शिकवता येत नाही? असा सवाल पालक करत आहेत. त्यामुळे असे काही शिक्षक आपले पाल्य खासगी शाळेत दाखल करून त्याला शिकवतात. अशा शिक्षकांना “गुरूजी, तुम्ही लई हुश्‍शार..! म्हणण्याची वेळ येते.

राजेगाव – आपल्या संस्कारांनी उद्याची उज्वल पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचीच मुले खासगी शाळेत भरमसाठ फी भरून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या शिकवणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तालुक्‍यातील अनेक शाळांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची हीच अवस्था असल्याचे दिसून येते.

शासकीय शाळांमधून पोषण आहार ते पुस्तके, गणवेश आदी वस्तूंचा पुरवठा केला जात असताना शाळांमध्ये पटसंख्येचा दिवसेंदिवस अभाव दिसून येतो. शाळा सुरू होताच मुलांच्या शोधार्थ गुरुजींना ऊसाचे फड शोधून विद्यार्थी पकडून आणण्याची वेळ येते. त्यामुळे कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी? अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येते. राजेगाव आणि तालुक्‍यातील अनेक शाळेवर अध्यापन करणारे गुरुजी हे पुणे जिल्ह्यातील बहुदा बारामती या शहरी भागात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलेही त्याच ठिकाणी शिक्षण घेताना आढळून येत आहेत. आपला मुलगा शिकून मोठा शासकीय अधिकारी व्हावा, हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ग्रामीण भागातील पालकांना हे स्वप्न भंगण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे सरकारी शाळेचे भवितव्य धोक्‍यात असण्याला काहीमात्र शिक्षकच कारणीभूत आहेत, असे बोलले जात आहे.

आपल्या अध्यापनावर आपला विश्वास नाही म्हणूनच शिक्षकांचे पाल्य महागड्या खासगी शाळेत शिक्षणाचे धडे घेत नसतील ना? असे नानाविध अनुत्तरित प्रश्न पालकांना विचार करण्यास भाग पाडत आहेत. आपल्या कृतीतून ज्ञान शिकवणारे शिक्षकच असे करू लागले तर इतर पालकही सरकारी शाळेच्या शिक्षण पद्धतीला दोष देत त्यांचे अनुकरण करणार नाहीत कशावरून? सरकारी शाळा सर्वगुणसंपन्न होण्यासाठी सध्या ग्रामस्थ आणि तरुणांकडून मोठे योगदान मिळत आहे. शाळा रंगरंगोटीकरण, पाणी फिल्टर, प्रोजेक्‍टर, शालेय साहित्य, खेळाचे साहित्य आदींच्या माध्यमातून मदत करत असतात. सरकारी शाळांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक सोयी सुविधा, योजना राबवल्या जात आहेत. याकडे पाठ फिरवून शिक्षक मंडळी मोठी रक्कम भरून खासगी शाळेतच धन्यता मानत आहेत. सीईटीसारख्या परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवलेल्या या शासकीय गुरुजींनी आता खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकच अधिक प्रभावीपणे अध्यापनाचे काम करतात, असे वाटू लागले आहे. मात्र, दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पटवारीकडे किमान शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत शिक्षणप्रेमीकडून व्यक्त करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)