पुणे जिल्हा: शेतमालाला हमीभाव सध्या तरी अशक्‍य

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा सरकारला घरचा आहेर

वाकी – हमीभाव केवळ बोलण्यासाठी सोपे आहे; मात्र सद्यस्थितीत तो देता येणे शक्‍य नाही. तसेच आडत्यांची आडत सुरू करणे शक्‍य नसल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चाकण (ता. खेड) येथे सांगितले. एकीकडे केंद्र व राज्य सरकार हमीभावाबाबत आश्‍वासने देत असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य करून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केट यार्डात येऊन कांद्याच्या दराबाबत आणि कांद्याच्या दराच्या चढ उताराच्या बाबत कायम स्वरूपी तोडगा काढता यावा, यासाठी बाजार समितीचे पदाधिकारी, आडते, व्यापारी आणि शेतकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन पाशा पटेल यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. याप्रसंगी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, बाजार समितीचे संचालक राम गोरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोणारी, खेड पंचायत समितीचे सदस्य अमृत शेवकरी, व्यापारी माणिक गोरे, जमीर काझी, काळूराम कड, अनिल देशमुख, बबन टिळेकर, बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे आदी उपस्थित होते.
पाशा पटेल म्हणाले, राज्य कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनंतर केंद्राने कांद्यावरील निर्यात मूल्य शून्यावर आणले आहे. त्यानंतर कांद्याला चांगला दर मिळत होता. कांद्याच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याची माहिती योग्य पद्धतीने प्रशासनाच्या समोर येत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. कांद्याच्या लागवडीपासून निर्यातीपर्यंत माहिती असलेल्या शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीमधील जाणकार मंडळींच्या समित्या करून कांद्याच्या प्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. राज्य भरातील शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शेतीमालाला बाजारभाव मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पिकांच्या उत्पादन खर्चाचा अंदाज काढून केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला शिफारस करणे, खुल्या बाजारातील शेतमालाच्या दराचा अभ्यास करून सरकारला हस्तक्षेप करण्यासाठी सल्ला देणे, हमी भावासाठी शिफारस करणे, वेळोवेळी उत्पादक तज्ज्ञांसोबत मेळावे घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, आदी कामे या आयोगामार्फत अधिक सक्षमपणे करण्यात येत आहेत. राम गोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

… तर बाजार समित्या इतिहास जमा होतील
शेतकरी, बाजार समिती आणि यातील मधली यंत्रणा यांनी कधीही बदलाचे स्वप्न पहिले नाही. त्यामुळे आजची स्थिती निर्माण झाली आहे. बाजार समित्या आणि आडते यांनी पुढील काळात यामध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्‍यक आहे आणि ही सुधारणा झाली नाही, तर पुढील काही वर्षांनी बाजार समित्या होत्या असे सांगावे लागेल. राज्य कृषी मूल्य आयोग आधुनिक होत असून, शेतमालाचे भाव ठरविण्याच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)