पुणे जिल्हा: वाळू उपसा कारवाईचे नुसतेच “कागदी घोडे’

भवरापुरातील वाळू चोरी प्रकरणातील पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर यांच्याबाबत हवेली तहसीलदारांकडून अहवाल मिळताच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय तलाठी योगीराज कणीचे यांचीही शासकीय चौकशी होवून कारवाई करण्यात येईल.
– ज्योती कदम, प्रांताधिकारी

वाघोली – अष्टापूर, भवरापूर, हिंगणगाव आदि पूर्व हवेली भागातील गावांमध्ये मुरूम, माती व वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर चालू होता. याभागात काम करणारे पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या विशेष सहकार्यातून धंदा फोफावल्याचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिध्द केल्यानंतर असे धंदे करणाऱ्यांवर नायब तहलिसदार, प्रांताधिकारी यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात असले तरी या प्रकरणात ठोस कारवाई ऐवजी केवळ कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार पोलीस यंत्रणा आणि शासकीय यंत्रणेकडून होत आहे.

अष्टापुर येथे चार वाळू साठ्यांवर तर हिगणगाव हद्दीत दोन बेकायदा माती साठ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील धक्कादायक बाब अशी की, शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाळू व माती साठ्याची माहिती दिल्यानंतरच कारवाई करण्यात येत आहे. भवरापूर (ता. हवेली) वाळू चोरी प्रकरणात तर पोलीस तपासात अशी माहिती उघड झाली आहे की, पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर याच्या ताब्यात मंडलअधिकाऱ्यांनी सहा वाहने दिली होती. त्यापैकी एक वाहन अद्यापही पोलीस पाटलाने पोलीस ठाण्यात जमा केले नाही. तसेच वाळू चोरी करणाऱ्या जमा केलेल्या वाहनांपैकी एक पोकलेन वाहन स्वतः पोलीस पाटील टिळेकर याच्या नावावर असल्याचे तसेच एक ट्रॅक्‍टर पोलीस पाटीलच्या वडिलांच्या नावे असल्याचे तपासात उघड झाल्याचे तपास अधिकारी महेंद्र चांदणे यांनी सांगितले आहे. या वाळू चोरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती; त्यात पोलीस पाटील टिळेकर याचा भाऊ धनंजय टिळेकर यालाही अटक झाली होती, त्यामुळे भवरापूर वाळू चोरी प्रकरणात पोलीस पाटील याचा कोणत्या आणि कशा प्रकारे सहभाग होता, हे पोलीस तपासात उघड झाले असून त्यानुसार अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, भवरापूर, हिंगणगाव आणि अष्टापुर येथील वाळू साठ्यांचे पंचनामे महसुलच्या तलाठी व मंडल अधिकारी यांनी केले आहेत. या वाळू साठ्यांत झाडे देखील वाढली आहेत, त्यामुळे या माती, मुरूम, वाळू साठ्यांवर स्वतः महसुलच्या कर्मचारी वर्गाने यापूर्वीच कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित होत असून याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनाही देण्यात आली आहे. या प्रकरणी योग्य आणि पारदर्शक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

पोलीस पाटील टिळेकर याच्या ताब्यातील वाहने गायब झाली होती. या बाबत प्रभातमध्ये बातमी येताच ती वाहने पोलीस पाटलाने स्वतः कशी आणि कोणाच्या मदतीने पोलीस ठाण्यात आणली? पोलीस पाटलाने जमा न केलेले आणखी एक वाहन इंदापूर येथे असल्याची चर्चा आहे. मग, हे वाहन पोलीस ठाण्यात जमा का केले नाही? चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने पोलीस पाटलाची असतील तर त्याच्यावर पोलीस किंवा शासकीय अधिकारी का कारवाई करीत नाहीत? या प्रश्‍नांची उत्तरे देण्याकरिता पोलीस आणि अधिकारीही तोंड उघडत नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)