पुणे जिल्हा: पाण्यापेक्षाही दूध स्वस्त

शेतकरी दुधाला योग्य भाव मिळण्याच्या प्रतिक्षेत

लाखणगाव -सध्या दुधाला 19 रुपये लिटर दर मिळत आहे.तर पाणी 20 रुपये लिटर दराने विकले जात असल्याने पाण्यापेक्षाही दूध स्वस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील सात ते आठ महिन्यांत दुधाच्या दरात 30 टक्‍के घसरण झाली आहे. या परिस्थितीचा विचार करता सरकारने यावर योग्य निर्णय घेऊन दूग्धजन्य पदार्थ निर्यातीवर भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.

सध्या दुधाचे दर मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 28 रुपये असणारा दुधाचा भाव आता 19 रुपये लिटरपर्यत खाली आला आहे. त्यामुळे दूध व्यवसाय मोडकळीस आला आहे.गेल्या आठ महिन्यांत दुधाच्या दरात 30 टक्‍के घसरण झाल्याचा दावा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पाण्यापेक्षाही दूध स्वस्त अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.

आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पादन घेतले जाते. या ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठा आहे. परंतु सध्या दुधाचे दर ढासळले आहेत. उन्हामुळे दुधाचे उत्पादनही थोडेसे घटले असून 28 रुपये लिटर असणारे दूध सध्या 19 रुपये लिटर दराने विकले जात असल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. चाऱ्याचे वाढलेले बाजारभाव, औषधाचा वाढलेला खर्च, सुग्रास भुशाचे वाढलेले बाजारभाव पाहाता दूध व्यवसाय आता मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. एवढे होऊनही सरकार मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव वाढीव देण्यासाठी तसेच ठरवून दिलेल्या दरानुसार खरेदी करण्यासाठी सक्‍ती करत नसून चकार शब्द काढत नाही.

वाढत्या उष्णतेमुळे जनावरांना आजार होत आहे. हा सर्व वाढलेला खर्च विचार करता सध्या दूध व्यावसाय तोट्यात करावा लागत आहे. शेतीतील पिकांची ढासळलेले बाजारभाव यामुळे शेतकरी मोठ्‌या प्रमाणावर दूध व्यवसाय करू लागला होता. परंतु दूध दरही मोठ्या प्रमाणावर पडल्याने शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे. जनावरांना चाऱ्यासाठी लागणारे मका, कडवळ, घास, गवत तसेच कडबा चाऱ्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. कडब्याची एक पेंढी 30 रुपयांना घ्यावी लागत आहे. तसेच सुग्रास भुसा खाद्यांच्या किमतीही अकराशे रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव कडाडला आहे. सध्या तापमानात झालेल्या वाढीमुळे दूध देणाऱ्या गायींच्या आजारातही वाढ झाली आहे. परिणामी डॉक्‍टरला होणारा खर्चही भरमसाट वाढला आहे. या सगळ्याचा विचार करता दूध उत्पादक शेतकरी खर्च जास्त व उत्पन्न कमी, अशा दुहेरी संकटात सापडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)